0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याचे पर्यटनमंत्री श्री. आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आदरातिथ्य क्षेत्रातील विविध घटकांसमवेत सुमारे २ हजार ९०५ कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. यातून राज्याच्या विविध भागात हॉटेल, रिसॉर्ट, वेलनेस सेंटर्स, हेल्थ फार्म, थिम पार्क. मेडीटेशन सेंटर, रोपवे, स्विमींग पूल, हॉटेल स्पा, हेल्थ क्लब, बोटींग आदी विविध पर्यटन सुविधांची निर्मिती होणार असून सुमारे ६ हजार ७५४ इतक्या रोजगाराची निर्मिती होणार आहे. राज्य शासनाने आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला असून यासाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. यापुढील काळातही या क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलू, असे यावेळी मंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री श्री. ठाकरे, राज्यमंत्री कुमारी तटकरे यांच्यासह पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर, सहायक संचालक रवींद्र पवार यांच्यासह आदरातिथ्य क्षेत्रातील उद्योजक आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

 
Top