BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
राज्यातील गृहनिर्माण संस्थांची संख्या विचारात घेता प्रत्यक्षात गृहनिर्माण संस्थेचे मानीव अभिहस्तांतरण झालेल्या संस्थांची संख्या अल्प आहे. मानीव अभिहस्तांतरण प्रक्रियेची माहिती सहज उपलब्ध व्हावी आणि ही प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून संस्थांसाठी दि. 1 ते 15 जानेवारी 2021 पर्यंत मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेअन्स) विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
सहकारमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, या मोहिमेद्वारे सहकारी गृहनिर्माण संस्थांना मानीव अभिहस्तांतरणाबाबतची माहिती देण्यात येणार आहे. गृहनिर्माण संस्था ज्या जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था तथा सक्षम प्राधिकारी यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे. त्या कार्यालयाकडे संस्थेने मानीव अभिहस्तांतरणाबाबतचा अर्ज विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावा.यामुळे राज्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या जमिनीचे कायदेशीर हक्क, विकासकाकडून प्राप्त करून देण्याचा प्रयत्न आहे. इमारत संस्थेची मालकीदेखील संस्थेचीच, यानुसार आपण या विशेष मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन सहकारमंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.
Post a comment