web-ads-yml-728x90

Breaking News

विविध सामंजस्य करारांमुळे राज्यातील पर्यटनाला चालना मिळेल-पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना आता चित्रपट, टीव्ही मालिका इत्यादींचे प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या ठिकाणी जाऊन चित्रीकरण (लाईव्ह शूटींग) पाहण्याची तसेच कलाकारांसमवेत संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालय आणि स्टारक्राफ्ट मनोरंजन प्राईम लिमिटेड यांच्यामध्ये पर्यटनमंत्री श्री. आदित्य ठाकरे, राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारांमुळे राज्यातील पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळांवर त्या ठिकाणांचा इतिहास, वैशिष्ट्ये आदींची माहिती देणारे ऑफलाईन क्यूआर कोडचे फलक लावण्यात येणार असून यासाठी पोलक्स स्टार एलएलपी यांच्यासमवेत सामंजस्य करार करण्यात आला. मुंबईत पुढील महिन्यात होणाऱ्या दी मुंबई फेस्टिव्हलसंदर्भात तसेच राज्यातील खाद्यसंस्कृतीला चालना देणारे सामंजस्य करारही यावेळी करण्यात आले. याशिवाय राज्यात विविध भागात सुरु झालेल्या कृषी पर्यटन केंद्रांना नोंदणी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास आमदार श्री. दीपक केसरकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्यासह सामंजस्य करार करण्यात आलेल्या विविध संस्थांचे प्रतिनिधी, कृषी पर्यटन केंद्रचालक उपस्थित होते.

No comments