web-ads-yml-728x90

Breaking News

अपारंपरिक ऊर्जा धोरणांतर्गत वीजनिर्मिती क्षेत्रात आगामी ५ वर्षात ७५ हजार कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात राज्यात येत्या पाच वर्षात 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून त्यातून राज्याच्या जीडीपीमध्ये महत्त्वपूर्ण भर पडू शकेल. या धोरणांतर्गत दरवर्षी 1 लाख सौर कृषिपंप देण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल; शाश्वत वीजपुरवठा होणार असल्याने कृषी उत्पादनातही भरीव वाढ होईल, असा विश्वास ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरण मंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.मंत्री डॉ. राऊत म्हणाले, राज्यात स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीसाठी हे धोरण क्रांतिकारक ठरणार आहे. याअंतर्गत येत्या पाच वर्षात अपारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या माध्यमातून 17 हजार 385 मे. वॅट. वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या धोरणांतर्गत राज्यातील जलाशयांवरही तरंगते सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. शेतीला दिवसा वीज देण्याच्या दृष्टीने या धोरणाची अंमलबजावणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यातून पुढील पाच वर्षात दरवर्षी 1 लाख याप्रमाणे 5 लाख सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत. ग्रामीण विद्युतीकरण कार्यक्रमांतर्गत प्रतिवर्षी 10 हजार घरांना सौरउर्जेद्वारे वीजपुरवठा करणे प्रस्तावित आहे.

No comments