गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागांतील पोलिसांसोबत गृहमंत्र्यांनी साजरी केली दिवाळी
BY - युवा महाराष्ट्र लाइव - गडचिरोली
नक्षलवादी हिंसाचाराच्या विरोधात लढणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागाला दिवाळीनिमित्त सपत्नीक भेट देऊन गृह मंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस जवानांची उमेद वाढविली. देशमुख यांनी शनिवारी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गडचिरोलीपासून तीनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या पातागुडमला भेट देऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली.शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अनिल देशमुख आणि त्यांच्या पत्नी आरतीताई हेलीकॉप्टरने पातागुडम येथे पोहोचले. यावेळी गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक संदीप पाटील, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया, सिरोंचा विभागाचे प्रांत अधिकारी प्रशांत स्वामी उपस्थित होते.दिवाळीच्या निमित्ताने प्रथमच गृह मंत्री येत असल्याने पोलिसांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गृहमंत्र्यांनी येथील पोलिसांशी संवाद साधला. नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांची आस्थेने चौकशी केली.
No comments