BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
माजी क्रिकेटपटू, अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू चेतन चौहान
यांच्या निधनाने भारतीय क्रिकेटचा एक गौरवशाली अध्याय संपला आहे, महान खेळाडू सुनील
गावस्कर यांच्या सोबतीने डावाची सुरुवात करणाऱ्या चेतन चौहान यांनी राजकारणातही यशस्वी
खेळी खेळली. भारतीय क्रिकेट आणि राजकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल ते नेहमी स्मरणात
राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.उपमुख्यमंत्री
अजित पवार शोकसंदेशात म्हणतात, सत्तरच्या दशकात भारताचे प्रतिनिधित्व करताना क्रिकेटपटू
चेतन चौहान यांनी सुनील गावस्कर यांच्यासोबत
अनेकदा डावाची यशस्वी सुरुवात केली. गावस्कर आणि चेतन चौहान जोडीला मिळालेली
लोकप्रियता क्वचितच कोणाच्या वाट्याला आली. चेतन चौहान उत्तर प्रदेशात जरी जन्मले असले
तरी वडिलांच्या सैन्यदलातील नोकरीच्या निमित्ताने त्यांचे तरुणपण पुण्यात गेले, येथेच
त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. त्यांची पुण्याशी जुळलेली नाळ खूप घट्ट होती. त्यांनी रणजीमध्ये अनेक
वर्षे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघातील सलामीचे फलंदाज
म्हणून ठसा उमटवला. निवृत्तीनंतर क्रिकेट अकादमीच्या
माध्यमातून तरुण खेळाडू घडविण्याबरोबरच ‘बीसीसीआय’मध्येही त्यांनी जबाबदारी पार पाडली.
चेतन चौहान यांचे क्रिकेट व राजकीय क्षेत्रातील योगदान क्रिकेट रसिकांसह सामान्य जनतेच्या
कायम स्मरणात राहील.
Post a comment