web-ads-yml-728x90

Breaking News

मार्की मांगली – २ कोळसा खाण लिलावातून वगळण्याची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची केंद्रीय मंत्र्यांना विनंती

 

BY -  युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र लिहून विदर्भातील मार्की मांगली – २ या कोळसा ब्लॉकचा लिलाव थांबविण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. हा लिलाव झाल्यास संपूर्ण वनक्षेत्रातील इकोसिस्टम आणि त्याच्यावर अवलंबून असलेले वन्यजीव यांचे खूप नुकसान होऊ शकते. मार्की मांगली – २ कोळसा ब्लॉक हा टीएटीआर – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या कॉरिडॉरमध्ये असल्यामुळे या भागातील वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे. खाण ब्लॉक प्रस्तावित असलेला विभाग हा ताडोबाच्या मंजूर व्याघ्र संवर्धन योजनेच्या क्षेत्राच्या अंतर्गत येतो.प्रस्तावित खाण क्षेत्रातील सुमारे २५० हेक्टर क्षेत्र हे या प्रकल्पाच्या जवळपास ५० टक्के क्षेत्र आहे. हे क्षेत्र यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन परिक्षेत्रातील राखीव जंगलभूमीवर आहे. २०१५ मध्ये पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्रालयाने ही प्रस्तावित खाण अबाधित क्षेत्रामध्ये असल्याचे नमूद केले आहे, परंतु २०१८ मध्ये मंत्रालयाने असे काही नमूद केल्याचे आढळून आले नसल्याचे काही वृत्तांमध्ये सूचित करण्यात आले आहे.पर्यावरणीयदृष्ट्या मौल्यवान असलेल्या या संवर्धन क्षेत्राचे होणारे संभाव्य नुकसान लक्षात घेता मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, या प्रकल्पामुळे प्रदेशातील वाघ केवळ त्यांचा नैसर्गिक अधिवास गमावणार नाहीत तर खाणकाम आणि माणसांच्या वाढत्या अस्तित्वामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे. त्यामुळे या कोळसा खाणीचा लिलाव थांबविण्यात यावा, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील बांदर कोळसा खाण प्रकरणी हस्तक्षेप करुन त्याचा लिलाव वगळल्याबद्दल मंत्री श्री. ठाकरे यांनी केंद्रीय मंत्र्यांचे आभार मानले आहेत. याबाबत मंत्री श्री.ठाकरे यांनी यापूर्वी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली होती. ते म्हणाले की, लिलाव यादीमधून बांदर खाण वगळल्यामुळे तिथे वाघांसाठी अत्यंत संवेदनशील असे इको झोन तयार होईल. यामुळे मौल्यवान जैवविविधतेचा नाश होण्यापासून संरक्षण झाले आहे, असे ते म्हणाले.

No comments