0

BY - मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव- ठाणे |
घोडबंदर रोडकडून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या टेम्पोमध्ये गुटख्याचा साठा असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार घोडबंदर रोडवरील स्कायलाईन आर्किड बिल्डिंग समोर पोलिसांनी गुटख्यासह टेम्पो पकडला. टेम्पोतून तब्बल साडेनऊ लाखांचा गुटखा पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी टेम्पोसह अहमजद शौकतअली शेख (32, वापी गुजरात) या चालकास अटक केली आहे. सध्या कोरोनामुळे परिस्थिती गंभीर झाली असताना शासनाने तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा व इतर तत्सम पदार्थ विक्री व वाहतुकीवर बंदी घातली आहे. तरी देखील सरकारने बंदी घातलेल्या विविध कंपनीच्या सुपाऱ्या आणि गुटख्याची विक्री छुप्या पद्धतीने सुरु आहे.दरम्यान, गुटख्याने भरलेला एक ट्रक गुजरात येथून घोडबंदर मार्गे ठाण्यात येणार असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकास मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, पोलीस निरीक्षक संजय शिंदे, पोलीस निरीक्षक विकास घोडके व त्यांच्या पथकाने घोडबंदर रोडवरील स्कायलाईन आर्किड या इमारती समोरून एक टेम्पो ताब्यात घेतला.
टेम्पोची तपासणी केली असता त्यात विमल गुटख्याच्या तब्बल 60 गोणी, सुगंधी सुपारी, तंबाखू व इतर बंदी असलेले तत्सम पदार्थ आढळून आले. पोलिसांनी साडे नऊ लाखाचा गुटखा आणि टेम्पो असा एकूण 12 लाखाचा मुद्देमाल जप्त करत टेम्पो चालकास अटक केली. हा गुटखा गुजरात राज्यातून आला असल्याचे समोर आले आहे. हा गुटखा कोणास पुरवण्यात करण्यात येणार होता याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Post a Comment

 
Top