0

BY - युवा महाराष्ट्र लाइव- अकोला |
पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ  बच्चू कडू यांनी पातूर तालुक्यातील दुर्गम वसाली, सोनुना, पांढुर्णा या गावांना भेटी देऊन तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांचे समवेत स्थानिक आमदार नितीन देशमुख तसेच सरपंच सुखनंदन डाखोरे, ग्रामसेवक अशोक बरके, तहसीलदार दीपक बाजड, वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश नालिंदे, प्रकल्प अधिकारी बाल विकास समाधान राठोड, पोलीस निरीक्षक गणेश वानरे आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी वसाली येथे त्यांच्या हस्ते वसाली ते सीता न्हानी मंदिर (वाडी) या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. या रस्त्यामुळे पर्यटन विकास होण्यास चालना मिळेल असे मत त्यांनी व्यक्त केले. सोनुना येथेही ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी सोनुना ते पांढुर्णा हा रस्ता तातडीने मग्रारोहयो अंतर्गत करण्यात यावा, असे निर्देश दिले. पांढुर्णा येथे आमदार नितीन देशमुख यांच्यासह सरपंच लक्ष्मी शेळके, पंचायत समिती सभापती लक्ष्मी डाखोरे, जि.प.सदस्य लता पवार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
या गावात रस्ते विकास दळणवळण सुविधा उपलब्ध करून देऊ तसेच गावात राहुटी उपक्रम राबवून प्रशासनाच्या सेवा गावात उपलब्ध करून देऊ, असेही त्यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले. त्यानंतर त्यांनी विवरा या गावात जाऊन तेथील गावकऱ्यांनाही संबोधित केले. यावेळी त्यांच्या हस्ते ग्रामपंचायत इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच वर्षा खरात, ग्रामसेवक पंजाबराव चव्हाण तसेच सदस्य ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Post a comment

 
Top