web-ads-yml-728x90

Breaking News

तत्वनिष्ठ कायदेतज्ञ गमावला,युवकांचा दीपस्तंभ हरपला


BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड साहेबांच्या निधनानं सच्चा, प्रामाणिक, तत्वनिष्ठ कायदेतज्ञ हरपला आहे. वारकरी संप्रदायाचा पाईक, संत साहित्याचा अभ्यासक, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीचा आधारस्तंभ आपण गमावला आहे. गावखेड्यात शिक्षण घेत असलेल्या व जीवनात मोठं होण्याचं स्वप्न बघणाऱ्या लाखो युवकांचा दीपस्तंभ आज हरपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करीत भास्करराव आव्हाड यांना श्रद्धांजली वाहिली. 
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, ज्येष्ठ विधीज्ञ भास्करराव आव्हाड हे पुण्याचे, महाराष्ट्राचे भूषण होते. शेतकरी  कुटुंबात जन्मलेल्या या वारकऱ्याच्या मुलाने अनेक अडचणी, संकटं, आव्हानांवर मात करुन वकिलीचं शिक्षण घेतलं. सचोटीनं, प्रामाणिकपणानं देखील वकिली करता येते याचा आदर्श निर्माण केला. आई-वडिलांकडून मिळालेली शेतीची, वारकरी संप्रदायाची परंपरा आनंदानं पुढे नेली. हे सगळं करत असताना अध्यात्माचा प्रचार-प्रसारही केला. अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्था-संघटनांना बळ देण्याचं काम त्यांनी केलं.  महाराष्ट्र  व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष असलेल्या भास्करराव आव्हाड साहेब हे जीवनाच्या अखेरपर्यंत ज्ञान आणि न्यायदानाचं कर्तव्य पार पाडत राहिले. त्यांच्यासारख्या तत्वनिष्ठ, चतुरस्त्र, लोकप्रिय व्यक्तिमत्वाचं निधन ही महाराष्ट्राची मोठी हानी आहे. आपण सर्वजण आव्हाड साहेबांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

No comments