0

BY - संतोष पिलके,युवा महाराष्ट्र लाइव- चिपळूण |
कोरोना परिस्थितीमुळे गेल्या चार- पाच महिन्यांपासून सर्वसामान्यांची अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना गेली आठवडाभर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भरारी पथकाने वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या पथकाने आर्थिक पिळवणूक थांबवावी अन्यथा आंदोलन छेडावे लागेल असा इशारा भाजपचे माजी चिपळूण तालुकाध्यक्ष सतीश मोरे यांनी देत या विभागाच्या भरारी पथकाच्यात हिम्मत असेल तर मुंबई- गोवा महामार्गावरील ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करून दाखवावी नाही तर आम्ही गाड्या पकडून देतो असे आव्हानच या अधिकाऱ्यांना दिले आहे.यावेळी ते पुढे म्हणाले की, देशात मार्च महिन्यापासून कोरोना परिस्थितीमुळे अर्थचक्र थांबले आहे.
 पर्यायाने वाहनधारकांनादेखील मोठा फटका बसला आहे. यातून काहीअंशी सावरण्यासाठी शासनाने कर्ज हप्त्यांमध्ये शिथिलता आणली आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील परिवहन विभागाचे भरारी पथकाने गेल्या आठवड्याभरापासून वाहनधारकांची आर्थिक पिळवणूक सुरू केली आहे. याबाबत ते पुढे म्हणतात की, महिला दुचाकीस्वारालाही ५ हजार  रुपयांचा दंड बसविला आहे. यावेळी या महिलेने विनंती केली. मात्र, हे निगरगट्ट अधिकारी ऐकले नाहीत. यावरून या अधिकाऱ्यांची काय मानसिकता आहे, हे यावरून दिसून येते, अशा शब्दांत या अधिकाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. वाहनांची पासिंग अथवा इतर कार्यवाही करण्यासाठी यांची कार्यालयेदेखील सुरू असणे आवश्यक होती. ज्या वाहनधारकांना शक्य होते त्यांनी तरी पासिंग अथवा इतर कार्यवाही केली असती असे यावेळी स्पष्ट केले. एकीकडे गाड्या पासिंग करून द्यायच्या नाहीत तर दुसरीकडे दंड वसूल केला जात आहे. मात्र, आता गेल्या आठवड्याभरापासून परिवहन विभागाच्या भरारी पथकाने वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारत आर्थिक पिळवणूक सुरू केली आहे. यामध्ये एका एका वाहनधारकांना ४० ते ५० हजार रुपयांचा दंड बसवित आहेत. या दंडाच्या रक्कमेपेक्षा कमी रक्कमेत गाडी पासिंग होऊ शकते, असे यावेळी निदर्शनास आणून दिले. ही बाब संतापजनक असून या  अधिकाऱ्यांनी आर्थिक पिळवणूकतेची कारवाई थांबवावी अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा दिला आहे. या परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची कारवाई पाहता शासन या अधिकाऱ्यांच्या आडून वाहनधारकांची आर्थिक पिळवणूक तर करीत नाही ना असा सवाल उपस्थित करीत हे सरकार जनतेचे आहे की या अधिकाऱ्यांचे अशा शब्दांत सरकारवर निशाणा साधला आहे. या अधिकाऱ्यांच्यात एवढी हिम्मत असेल तर महामार्गावर ओव्हरलोड गाड्या धावत आहेत. गाड्यांवर कारवाई करून दाखवावी असा इशारा देताना नाही तर आम्ही गाड्या पकडून दाखवितो, असे आव्हानच सतीश मोरे यांनी या अधिकाऱ्यांना दिले आहे. यावेळी वाहनधारक अमित सावंत यांनीदेखील या अधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला आहे.

Post a comment

 
Top