0

BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
आपले राज्य, देश नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या धारावी परिसरात कोरोनाविरुद्धच्या सुरू असलेल्या युद्धात धारावीकरांची सरशी झाल्याने मोठा दिलासा मिळाला असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी एक नवा ‘धारावी पॅटर्न’ समोर आला आहे. कोरोना नियंत्रणासाठी पोलीस यंत्रणेसोबत आरोग्य यंत्रणा, डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कामगार, या भागातील खासदार, आमदार, राज्य प्रशासन, महानगरपालिका, धारावीच्या आमदार व मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी शिक्षणमंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड तसेच अन्य लोकप्रतिनिधी यांनी निश्चितच प्रयत्नांची पराकाष्ठा केली. म्हणून हे यश दृष्टिक्षेपात आले.या मोहिमेत पोलीस विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी देखील मौलिक कामगिरी केली, त्याचा आपल्याला अभिमान असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. कोरोना मुक्तीसाठी धारावी परिसरात झालेले शासन, प्रशासन आणि जनता यांचे एकत्रित प्रयत्न आणि त्यामुळे कमी होत असलेली कोरोना रुग्णांची संख्या याची जागतिक आरोग्य संघटनेने देखील दखल घेतली आहे, ही बाब निश्चितच मोठ्या प्रमाणात दिलासा देणारी आहे. या कामी अगदी सुरुवातीपासून पोलीस यंत्रणेने विविध माध्यमातून धारावीतील नागरिकांना जागृत केले, असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे त्यांचाही मोठा वाटा या यशात आहे, असे श्री.देशमुख यांनी म्हटले आहे.
पोलिसांचे विविध प्रयत्न
धारावी परिसरात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून पोलीस यंत्रणा तातडीने सतर्क झाली. अत्यंत दाट लोकवस्ती, अरुंद गल्ल्या, यातून केवळ एकावेळी एकच व्यक्ती जाऊ शकते अशी परिस्थिती, त्यामुळे सोशल डिस्टंसिंग पाळणे हे अत्यंत कठीण. त्यावर नियंत्रण करण्यासाठी पोलिसांनी विविध माध्यमातून जनजागृती सुरू केली. पोलिसांच्या गाडीतून ध्वनिक्षेपकद्वारे माहिती देणे. तसेच अत्याधुनिक अशा ड्रोनचा उपयोग करून त्यावरील ध्वनिक्षेपकद्वारे लोकांना माहिती देऊन जागृत करणे. या अत्याधुनिक ड्रोनमुळे जवळपास चार किलोमीटरचा परिसर कव्हर होत होता. तसेच काही प्रसंगी नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून, त्यांना कोरोनाचे दुष्परिणाम समजावून सांगणे. अशा प्रकारची कामे पोलिसांनी केली. तसेच कोरोनाबद्दल काय दक्षता घ्यावी याची ऑडिओ क्लिप बनवून तिचे प्रसारण व्हॉट्सअप ग्रुपद्वारे, सामाजिक सुरक्षा अंतर राखून मीटिंग घेऊन त्याद्वारे, तसेच मंदिर, मशीद यातील ध्वनिक्षेपकाद्वारे लोकांपर्यंत ती क्लिप, त्यातील माहिती पोहोचविली. अरुंद गल्ल्यातून पायी गस्त घालून लोकांची जनजागृती केली.

Post a comment

 
Top