BY - युवा महाराष्ट्र लाइव - वर्धा |
समुद्रपूर तालुक्यातील जाम येथे एका वाहन
चालकाचा आजाराने घरातच मृत्यू झाला. ही माहिती गावात पसरताच खळबळ निर्माण झाली.
यामुळे मृतदेहाची कोरोना चाचणी करून अहवाल येइपर्यंत मृतदेह शीतगृहात ठेवावा, अशी
मागणी गावकऱ्यांनी केली. समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर
ग्रामस्थांनी भीतीपोटी मृतदेह घेण्यास नकार दिल्याने प्रशासनाने वाहनचालकाच्या
मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
समन्वयाचा अभाव, मृतदेह न्यायाचा कुठे?
रुग्णवाहिका जाम येथे पोहचली. मात्र, यावेळी
मृतदेह नेमका न्यायचा कुठे हिंगणघाट की समुद्रपूर असा प्रश्न पडला. कारण मृत्यू
कोरोनाने झाल्याचा संशय असल्याने अहवाल येईपर्यंत मृतदेह ठेवण्यासाठी शीतगृहाची
व्यवस्था हिगंणघाट येथेच आहे. नेमका मृतदेह कुठे न्यावा यावर एकमत होत नव्हते.
हिंगणघाट आणि समुद्रपूर येथील आरोग्य यंत्रणेत
समन्वय नसल्याने मृतदेह तब्बल तीन तास घरातच पडून राहिला.ही माहिती समजताच जिल्हा
शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांनी आदेश देत मार्ग काढला.
कोरोनाच्या भीतीने मृतदेह घेण्यास नकार ....
या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचा संशय
असल्याने गावातील नागरिकांनी भीतीपोटी कोरोना तपासणी अहवाल येईपर्यंत मृतदेह
दवाखाण्यात ठेवण्याची मागणी केली होती. मृत व्यक्तीच्या घरी केवळ वयोवृद्ध आई एकटी
असल्याने अंत्यसंस्कार करणार कोण हा प्रश्न होता. शवविच्छेदनानंतर मृतदेह घेण्यास
गावकऱ्यांनी नकार दिल्याने प्रशासनाने मृतदेहावर अंत्यसंस्कार करावेत, असे आदेश
प्रभारी तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी यांनी दिले.यावेळी प्रभारी तहसीलदार महेंद्र
सुर्यवशी, ठाणेदार हेमंत चांदेवार, पोलीस उपनिरीक्षक माधुरी गायकवाड, तालुका
वैदकीय अधिकारी डॉ. सुनील भगत, पोलीस पाटील कवडू सोमलकर, सरपंच सचिन गावंडे,
ग्रामसेवक धोटे, तलाठी उपस्थित होते.
मृतदेहाची विटंबना होऊ नये यासाठी प्रयत्न करणार
- जिल्हा शल्यचिकित्सक
मृतदेह देताना हा 1% हायड्रोक्लोराईडने
निर्जंतूक करून त्याला प्लास्टिक मध्ये व्यवस्थित पॅक करून दिले जातात. यासह वरून
सुद्धा निर्जंतुक करून दिले जातात. यात मृतदेहाला हात लावण्याची भीती नाही. तरी
खबरदारी म्हणून अशा वेळी मास्क आणि हॅन्ड ग्लोव्हज देण्यास आरोग्य विभाग तयार
आहे.मात्र, मृतदेहाची विटंबना होऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शल्य चिकित्सक
डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी बोलताना सांगितले.
Post a comment