0

BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
मुंबई महानगर क्षेत्रात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी आजपासून महाविद्यालयाची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. यात सर्व महाविद्यालयात असलेल्या व्यवस्थापन कोट्यांच्या आणि ऑनलाइन प्रवेशाच्या जागांची माहिती ऑनलाइन पध्दतीने संकलित केली जाणार आहे. त्यासोबतच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य आणि अकरावी प्रवेशाची जबाबदारी सांभाळणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.कोरोना आणि त्या संदर्भातील पार्श्वभूमी लक्षात घेता यावेळी पहिल्यांदाच हे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने होणार असून त्यासाठीचे वेळापत्रक विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्रसिद्ध केले आहे.मुंबई महानगर क्षेत्रात सुमारे 750 हून अधिक कनिष्ठ महाविद्यालय आहेत. या महाविद्यालयातील प्रवेशाच्या जागांची नोंदणी पुढील दोन दिवसात केली जाणार आहे. मुंबईतील दक्षिण मुंबई, पश्चिम मुंबई, आणि उत्तर मुंबई या भागात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी १ जुलै रोजी पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर ठाणे महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, नवी मुंबई, पनवेल, महानगरपालिका उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर महानगरपालिका या परिसरातील महाविद्यालयांची नोंदणी 2 जुलै रोजी सकाळी 11 ते सायंकाळी चार या वेळात केली जाणार आहे.दोन दिवसात करण्यात येणाऱ्या नोंदणीत सर्व महाविद्यालयांनी आपल्या प्रतिनिधींना प्रशिक्षणासाठी मंडळाने नेमून दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन उपस्थित ठेवावे, तशा सूचनाही शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिल्या आहेत.यंदाच्या अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी पहिल्यांदाच डिजिटल पुस्तिका, मोबाईल ॲप अशा प्रकारच्या सुविधा लवकरच सुरू केल्या जाणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिली.
मागील वर्षी महाविद्यालयाच्या नोंदणी प्रक्रियेत अनेक महाविद्यालयांनी नोंदणी करण्यास टाळाटाळ केली होती. मात्र त्यावर शिक्षण उपसंचालक कार्यालयाने कोणती कारवाई केली नव्हती. यंदा मुंबई आणि परिसरात कोरोनाच्या प्रादुर्भावाने अनेक महाविद्यालय त्यांची कार्यालय अद्यापही बंद आहेत. यामुळे अनेक महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया दोन दिवसात पूर्ण होईल की नाही याबद्दल शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांमध्येच संभ्रम निर्माण झाला आहे.

Post a comment

 
Top