0

BY - युवा महाराष्ट्र लाइव - अमरावती |
कोरोना संकटामुळे आर्थिक प्रश्न उभे राहिले, तरीही त्यातून मार्ग काढत विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. जिल्ह्यात आवश्यक पायाभूत सुविधांची कामे नियोजनानुसार पूर्ण केली जातील. त्यानुसार जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात वन विभागाच्या अखत्यारित नसलेल्या क्षेत्रात कामे सुरु करण्यात आली आहेत. हायब्रीड ॲन्युईटीअंतर्गत कामे व इतर कामांसाठी निधीबाबत पाठपुरावा होत आहे. रस्तेविकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिली.जिल्ह्यात हायब्रीड ॲन्युईटीअंतर्गत २६५ किलोमीटर लांबीची कामे पूर्णत्वास गेली आहेत. कोरोना संकटकाळ, लॉकडाऊन आदींमुळे उर्वरित कामांमध्ये काहीसे अडथळे आले. मात्र, त्याही कामांना गती देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. याबाबत पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी नुकतीच सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक घेऊन आवश्यक रस्ते, पूल व इमारतींची कामे प्राधान्यक्रम लक्षात घेऊन पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात वन विभागाच्या अखत्यारित येत नसलेल्या क्षेत्रात कामे सुरु करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे, उर्वरित कामांना वन विभागाची परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न होत आहेत.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाने वेळोवेळी येणाऱ्या अडचणींबाबत माहिती द्यावी. परतवाडा-चिखलदरा-घटांग मार्गाबाबतही परवानगीसाठी वन विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, शासन स्तरावरही स्वतंत्रपणे पाठपुरावा करण्यात येईल. वनविभागाच्या परवानगीसह इतर कुठल्याही अडचणी आल्यास तत्काळ कळवावे. शासनाकडे आपण स्वत: पाठपुरावा करू. मात्र, जिल्ह्याच्या रस्ते विकासात अडथळा येता कामा नये, असे सुस्पष्ट निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले.
लॉकडाऊनमध्ये विकासकामांची गती काहीशी मंदावली असली तरी, विकासकामे नियोजनानुसार पूर्णत्वास नेण्याचा शासनाचा निर्धार आहे. ग्रामीण भागात रोजगार निर्मितीच्या दृष्टीने विविध कामांना चालना देण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर रस्तेविकास, जलसंधारणाची कामे पूर्णत्वास जात आहेत. त्याचप्रमाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील जिल्ह्यातील महत्त्वाच्या रस्त्यांची कामेही रखडता कामा नयेत. पावसाळा लक्षात घेता प्राधान्यक्रम लक्षात घेऊन आवश्यक कामे तत्काळ पूर्ण करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमुळे अपघात संभवतात. तसे घडता कामा नये. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डेदुरुस्ती तत्काळ करून घ्यावी. मेळघाटातील रस्तेविकासाकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. मेळघाटात दुर्गम भागातील गावांचा संपर्क तुटता कामा नये, यासाठी विशेष लक्ष पुरवून गतीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.अमरावती-चांगापूर-वलगाव, अंजनगाव-दर्यापूर-म्हैसांग, वलगाव-दर्यापूर, अमरावती-कौंडण्यपूर,परतवाडा-चिखलदरा, रिद्धपूर-तिवसा, चांदूर रेल्वे-तळेगाव, तसेच अमरावती-अचलपूर हा चौपदरी रस्ता आदी विविध कामे पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्न व्हावेत, असेही निर्देश त्यांनी दिले.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हायब्रीड ॲन्युईटीअंतर्गत सुमारे पाचशे कोटी रूपयांच्या निधीतून महत्त्वाच्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित कामांसाठी २३० कोटी रूपये निधीची मागणी करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे कामे थांबली होती. मात्र, आता ती पूर्ववत होत आहेत, अशी माहिती विभागाच्या अधीक्षक अभियंता अरूंधती शर्मा यांनी दिली.

Post a comment

 
Top