BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात खासगी रुग्णालये बंद असल्यामुळे
सामान्यांना वैद्यकीय सल्ला, आरोग्य तपासणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन ई-संजीवनी
ओपीडी सेवेचा महिन्याभरात १४०३ रुग्णांनी लाभ घेतला आहे. या सेवेसाठी मोबाईल ॲप
तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून आठवडाभरात ते कार्यान्वित झाल्यानंतर
या सेवेच्या माध्यमातून अधिकाधिक रुग्णांना लाभ घेता येऊ शकेल. राज्यात एप्रिलमध्ये
प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा मे मध्ये पूर्णपणे सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी
www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला रुग्णांनी भेट देऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा,
असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले होते. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून एखादा
रुग्ण राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून कुठल्याही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत
संगणक, लॅपटॉप यांचा वापर करून कुठल्याही आजारावर सल्ला मसलत करू शकतो. या सेवेचे मोबाईल
ॲप तयार झाल्यावर त्याचा सामान्यांकडून वापर अधिक प्रमाणात वाढेल. त्यावेळेस आवश्यकता
भासल्यास डॉक्टरांची संख्या वाढविता येईल तसेच विशेषज्ञांच्या सेवांसाठी विशिष्ट वेळ
देखील दिली जाईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.
Post a comment