web-ads-yml-728x90

Breaking News

ठाण्यात १००० खाटांच्या कोव्हिड रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच सेवेत दाखल;पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला कामाचा आढावा


BY - मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे  |
ठाण्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी उभारण्यात येत असलेल्या १ हजार खाटांच्या तात्पुरत्या रुग्णालयाच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच हे रुग्णालय रुग्णसेवेत दाखल करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येथे दिली.
ठाण्यात करोनाची साथ आटोक्यात यावी आणि रुग्णसंख्या कमी व्हावी, यासाठी प्रशासन निकराचे प्रयत्न करत आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने संबंधित यंत्रणांच्या बैठका घेऊन प्रयत्नांमध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने आणि अधिक प्रभावी पावले उचलण्यासाठी आघाडीवर राहून करोनाविरोधातील या लढाईचे नेतृत्व करत आहेत. तसेच, कोव्हिड रुग्णालये व क्वारंटाइन केंद्रांना सातत्याने भेटी देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेऊन त्रुटी दूर करत आहेत. करोनारुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णांवरील उपचारांसाठी बेड्स कमी पडू नयेत, यासाठी श्री. शिंदे यांनी माजिवडा येथील ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे एक हजार खाटांचे तात्पुरते रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला होता. यापैकी ५०० खाटा विनाऑक्सिजन, तर ५०० खाटा ऑक्सिजन पुरवठ्यासह उपलब्ध असतील; शिवाय १०० बेड्सचे आयसीयू युनिट, डायलिसिस सेंटर, तपासणी लॅब आदी अद्ययावत सुविधा देखील येथे असणार आहेत.
गेले दोन आठवडे हे रुग्णालय उभारण्याचे काम दिवस-रात्र सुरू असून गुरुवारी श्री. शिंदे यांनी पुन्हा या ठिकाणी भेट देऊन कामाचा आढावा घेतला. याप्रसंगी खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, नगरसेवक नजीब मुल्ला, महापालिका आयुक्त विजय सिंघल व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  ‘तात्पुरत्या स्वरुपातील हे रुग्णालय असले तरी जागतिक दर्जाच्या अद्ययावत वैद्यकीय सुविधा येथे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत,’ असे श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच, गरज भासल्यास येथील क्षमता वाढवण्यात येईल, असेही ते म्हणाले. विक्रमी वेळेत या दर्जेदार रुग्णालयाची उभारणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. गरज पडल्यास ठाण्यात अन्य ठिकाणीही अशा प्रकारची रुग्णालये उभारण्याबाबत विचार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

No comments