BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
राज्यातील उद्योगांमधील उपलब्ध रोजगारसंधींची माहिती बेरोजगार
तरुणांना आता संकेतस्थळावर मिळणार आहे. याशिवाय याच संकेतस्थळावर उद्योजकांनाही राज्याच्या
विविध भागात उपलब्ध असलेल्या विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची माहिती मिळणार आहे. यासाठी कौशल्य विकास
विभागाच्या माध्यमातून www.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या
संकेतस्थळाद्वारे उद्योजक आणि त्यांना आवश्यक असलेल्या कुशल मनुष्यबळामध्ये समन्वय
साधून दोघांनाही उपयोगी ठरणारे माध्यम तयार करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास
मंत्री श्री. नवाब मलिक यांनी दिली.
खाजगी, शासकीय रोजगारसंधींची माहिती
होते उपलब्ध
बेरोजगार तरुणांसाठी या
संकेतस्थळावर विविध सुविधा उपलब्ध आहेत. यासाठी त्यांनी संकेतस्थळावर त्यांच्या शैक्षणिक
आणि इतर माहितीसह नोंदणी करणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे आवश्यकतेनुसार एखाद्या
उद्योग अथवा आस्थापनेकडून त्यांना जॉब ऑफर मिळू शकते. याशिवाय नोकरी साधक (नोकरी शोध)
याठिकाणी क्लिक केल्यावर रोजगार यादी, क्षेत्र, स्थान व शिक्षणानूसार रोजगार संधींची
माहिती मिळते. विविध माध्यमांमध्ये प्रसिध्द होणाऱ्या रिक्त पदांच्या जाहिराती पाहण्यासाठी
“रिक्तपदांच्या जाहिराती” (Vacancy Advertisement) या टॅबव्दारे माहिती मिळू शकते.
शासकीय तसेच खासगी अधिसूचीत रिक्तपदांची माहिती, त्यासाठी उमेदवारी अर्ज सादर करणे,
राज्यभरात आयोजित होणाऱ्या रोजगार मेळाव्यांची माहिती मिळवणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमात
सहभागी होणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना
व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे आणि सहभाग घेणे, अण्णासाहेब
पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या स्वयंरोजगारासाठी योजनांची माहिती मिळविणे व लाभ घेण्यासाठी
उचित योजनेंतर्गत प्रकरण सादर करणे आदी कार्यवाही करता येते.
Post a comment