अभियंत्यांनी परिवर्तनाचे अग्रदूत व्हावे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
आजच्या विज्ञान व तंत्रज्ञान युगात अभियंत्यांची भूमिका अतिशय
महत्त्वाची आहे. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान स्नातकांनी केवळ तंत्रज्ञ न होता परिवर्तन
व प्रगतीचे अग्रदूत होऊन राष्ट्रनिर्मितीमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल भगत
सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.लोणेरे, जि. रायगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र
विद्यापीठाचा २२ वा दीक्षान्त समारंभ आज संपन्न झाला. यावेळी कुलपती या नात्याने
स्नातकांना राज भवन, मुंबई येथून संबोधित करताना राज्यपाल बोलत होते.स्नातकांनी आपल्या
डोळयांसमोर उच्च ध्येय ठेवून त्याच्या प्राप्तीसाठी समर्पित भावनेने कार्य केल्यास
देशात स्वामी विवेकानंद, अब्दुल कलाम, जगदीश चंद्र बोस यांसारख्या महान प्रभृती निर्माण
होतील असे राज्यपालांनी सांगितले.भारतातील युवक छत्रपती शिवाजी महाराज, गरु गोविंद
सिंग यांसारख्या शूरवीर महापुरुषांचे वारसदार असून कोरोनासारख्या संकटाने भयभीत न
होता सुरक्षित अंतर राखून आपले कार्य अधिक नेटाने केल्यास देश प्रतिकूल परिस्थितीतदेखील
अधिक वेगाने प्रगती करील, असे राज्यपालांनी सांगितले.तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या समस्यांबददल
आपण अवगत असून विद्यापीठाला शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन उच्च व
तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिले.राज्यपालांच्या हस्ते यावेळी सहा उमेदवारांना
अभियांत्रिकी शाखेतील पीएच.डी. प्रदान करण्यात आली तसेच २५ एम.टेक, बी.टेक, पदविका
व अॅडव्हान्स डिप्लोमा स्नातकांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.विद्यापीठाचे कुलगुरु
प्रो. वेदला रामा शास्त्री यांच्या हस्ते ७४ विद्यार्थ्यांना एम. टेक, ६७२ विद्यार्थ्यांना
बी.टेक, ४२१ विद्यार्थ्यांना पदविका व ३१ उमेदवारांना अॅडव्हान्स डिप्लोमा – अशा एकूण
१२०४ स्नातकांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
No comments