0

BY - युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण |
कल्याणमधील सुमारे ४० ते ४५ टांगाचालक आजही कल्याण स्थानक ते दूधनाका परिसरात टांगा व्यवसाय करत असून या टांग्यांना प्रवाशांची चांगली पसंती मिळते. मात्र लॉकडाउनमुळे मागील ५० दिवसांपासून अधिक काळ अन्य वाहतुकीसह टांगा वाहतूकही बंद असून या टांगाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आपण एखाद्या दिवशी उपाशी राहू शकतो, मात्र त्या मुक्या जनावरांची उपासमार सहन होत नसल्याची खंत व्यक्त करत टांगाचालकांनी मदतीची मागणी केली आहे.अन्य शहरांत टांगा वाहतूक जवळपास नामशेष झाली असली तरी कल्याणकरांच्या प्रेमामुळे कल्याण दूधनाका- टिळकचौक ते स्थानक या मार्गावर टांगा वाहतूक नियमित सुरू असते. आजही दूधनाक्यावर सुमारे ४० ते ४५ टांगाचालक दररोज प्रवासी वाहतूक करून उदरनिर्वाह करतात. मात्र करोना लॉकडाउनमुळे रस्त्यावर पडणारी ती घोड्याच्या टापांची टपटप थांबली असून हातावरच स्वतःचे आणि घोड्याचे पोट असलेल्या या टांगेचालकांना नैराश्याने ग्रासले आहे. मागील दोन महिने उसनवार काढत कसेबसे ढकलले, मात्र आता यापुढचे दिवस कठीण आहेत. आम्हालाच खायला मिळत नाही मग घोड्याला खायला कुठून आणायचे? त्या मुक्या प्राण्यांचे होणारे हाल कमी करण्यासाठी तरी सरकारने आपल्याला मदत करावी, दीडशे वर्षांपासूनचा परंपरागत व्यवसाय बंद पडू नये, यासाठी सुरू असलेली आमची तगमग सरकारने समजून घेत आपल्याला मदतीचा हात द्यावा, अशी मागणी टांगाचालक मालक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Post a comment

 
Top