web-ads-yml-728x90

Breaking News

मुंबईत पुढील आठवड्यात मान्सूनपूर्व सरी


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
लॉकडाउनचा सामना करीत असलेल्या महाराष्ट्राला आता पावसाचे वेध लागले आहेत. भारतीय हवामान विभागाने गुरुवारी पावसाबाबत आनंदाची बातमी दिली आहे. अरबी समुद्रात मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने १ जून रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मुंबईमध्येही पुढील आठवड्यात मान्सूनपूर्व सरींचा अंदाज आहे. पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव आता अधिक तीव्र होत आहे. मान्सूनने गुरुवार, २८ मे रोजी अंदमान-निकोबार बेटे, दक्षिण बंगालचा उपसागर, मालदीव-कोमोरीन क्षेत्राचा काही भाग व्यापला. येत्या ४८ तासांमध्ये मालदीव-कोमोरिनचे आणखी काही क्षेत्रही व्यापले जाईल. अरबी समुद्रामध्ये मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. आग्नेय आणि पूर्व-मध्य अरबी समुद्रामध्ये ३१ मे ते ४ जून दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे केरळमध्ये १ जून रोजी मान्सून दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. याआधी केरळमध्ये मान्सून चार दिवस उशिरा दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, यामध्ये अधिक-उणे चार दिवसांचा फरक अपेक्षित असतो. जूनमध्ये सुरू होणाऱ्या पावसावर शेती आणि अर्थचक्र अवलंबून असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांनाही पावसाची प्रतीक्षा आहे.
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर मग त्याच्या महाराष्ट्रातील आगमनाबद्दल पूर्वानुमान वर्तवण्यात येईल. मात्र पुढील आठवड्यात मुंबईमध्ये मान्सूनपूर्व सरींची शक्यता आहे, असे प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.

No comments