web-ads-yml-728x90

Breaking News

‘अत्यावश्यक’ दुकाने पाचनंतर बंद!


BY - युवा महाराष्ट्र लाइव - कल्याण |
कल्याण-डोंबिवली शहरातील करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध योजना राबविल्या जात असल्या तरी नागरिकांकडून नियमांची पायमल्ली सुरूच आहे. यामुळे शहरातील करोनाची लागण तिसऱ्या टप्प्यावर पोहोचली आहे. मात्र तरीही नागरिक सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळेच केडीएमसी प्रशासनाकडून अनेक निर्बंध घातले जात आहेत.करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता मेडिकल आणि क्लिनिक वगळता अन्य जीवनावश्यक वस्तूदेखील १२ तासच उपलब्ध होणार आहेत. सकाळी पाच ते संध्याकाळी पाच या वेळेतच नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येणार असून संध्याकाळी पाचनंतर या सर्व आस्थापना बंद करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले आहेत.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन केले असले तरी सर्वच छोट्या-मोठ्या दुकानांत नागरिक खरेदीसाठी रांगा लावत गर्दी करत आहेत. यामुळे सुरक्षित अंतर ठेवण्याच्या आवाहनाचा फज्जा उडत आहे. सकाळी भाजीखरेदीसाठी नागरिक गर्दी करतात.यामुळेच मंगळवारपासून सकाळी पाच ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच बेकरी, डेअरी, किराणा दुकाने, भाजीपाला यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवली जातील तर संध्याकाळी पाचनंतर ही सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. केवळ मेडिकल आणि क्लिनिकच पूर्णवेळ सुरू ठेवता येणार आहेत. तसेच, या आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आदेशात नमूद केले आहे.

No comments