0

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
केवळ आरक्षणाने महिलांची सर्वांगीण प्रगती साध्य होणार नसून त्यासाठी त्यांचे हक्क आणि आदर दिला गेला पाहिजे. महिलांवरील कौटुंबिक अत्याचार रोखण्यासाठी मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल करणे आवश्यक असून तरुण पिढीला शिक्षणातूनच याविषयीच्या नैतिक मूल्यांचे धडे देण्याची गरज आहे, असे मत महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले. ‘महाराष्ट्र राज्य महिला आयोग’ आणि ‘इंटरनॅशनल जस्टीस मिशन’ (आयजेएम) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लॉकडाऊन काळातील कौटुंबिक हिंसाचार : सामना व सुरक्षिततेचे उपाय’ याविषयीच्या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन काल ॲड.ठाकूर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केले. या कार्यक्रमात राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव आस्था लुथरा, महिला  व बालकांवरील अत्याचार प्रतिबंध कक्षाचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, निवृत्त न्यायमुर्ती रोशन दळवी, आयजेएमच्या संचालिका मेलिसा वालावलकर, टाटा सामाजिक संस्थेच्या तृप्ती पांचाळ, राज्य महिला आयोगाचे अधिकारी, कर्मचारी आणि महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या विविध समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी मंत्री ॲड.ठाकूर यांनी लॉकडाऊनच्या काळात महिलांना न्याय, दिलासा मिळवून देण्याच्या राज्य महिला आयोगाच्या प्रयत्नांचे कौतुक करत, आज प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तिकेकरिता अभिनंदन  केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक महिलांपर्यंत ही पुस्तिका पोहोचवावी अशा सुचनाही दिल्या. महिलांच्या सामाजिक शोषणासोबत मानसिक आरोग्यकडेही लक्ष दिले गेले पाहिजे असे त्यांनी सांगितले.  

Post a comment

 
Top