0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या व्यापक उपाययोजनांच्या अनुषंगाने आज सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अल्पसंख्याक विकास तथा कौशल्य विकास मंत्री  नवाब मलिक यांनी राज्यातील विविध धर्मातील प्रभावशाली व्यक्ती, धर्मगुरु, धार्मिक नेते आदींबरोबर युनिसेफच्या सहकार्याने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. कोरोनासंदर्भात लोकांमध्ये भीती आणि गैरसमजाचे वातावरण आहे. त्यामुळे लागण झालेले अनेक रुग्ण शेवटच्या क्षणाला उपचारासाठी दवाखान्यात येतात. लोकांच्या मनातील हे गैरसमज दूर करण्यासाठी धार्मिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी मंत्री श्री.टोपे आणि श्री.मलिक यांनी केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनामार्फत करण्यात येत असलेल्या सर्व प्रयत्नांमध्ये आम्ही सोबत राहू, अशी ग्वाही यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिली.  आरोग्यमंत्री  श्री.टोपे यावेळी म्हणाले की, लोकांच्या मनामध्ये कोरोनाविषयी भीती आणि गैरसमज आहेत. त्यामुळे अजूनही अनेक लोक उपचारासाठी पुढे येत नाहीत असे लक्षात आले आहे. अनेक जण लक्षणे दिसूनही ती लपवून ठेवत आहेत. अशा वेळी या व्यक्ती शेवटच्या क्षणाला दवाखान्यात दाखल झाल्यास त्यांच्यावर उपचार करणे कठीण जाते. त्यामुळे कोरोनासंदर्भातील मनातील भीती दूर करुन लोकांनी तपासणीसाठी पुढे आले पाहिजे. धार्मिक नेते, संस्थांनी याबाबत लोकांचे प्रबोधन करावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्यात १०० कोरोना रुग्णांपैकी ९७ रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. हेही लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.     

Post a comment

 
Top