0

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने उत्तमोत्तम आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न शासन करत आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज झूम ॲपद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईत असलेल्या खाजगी दवाखान्यातील ८०% बेड नव्वद दिवसासाठी ताब्यात घेतले असून त्याचा कोविड, नॉन कोविड अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णांसाठी उपयोग केला जाणार आहे. उर्वरित २० टक्के बेड हे हॉस्पिटलला त्यांच्या इतर रुग्णांसाठी ठेवण्यात आलेले आहेत. अशा प्रकारची व्यवस्था कित्येक वर्षात प्रथमच करण्यात आली असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे महापालिकेतर्फे मुंबईतील लोकांसाठी एक डॅशबोर्ड तयार करण्यात आला असून त्याद्वारे मुंबईतील सर्व खासगी रुग्णालयासहित सर्व रुग्णालयाची माहिती, तेथे रिक्त असलेल्या बेडची माहिती कळणार आहे. याकरिता १९१६ या कंट्रोल रूमच्या नंबरवर फोन केल्यास नागरिकांना ही माहिती कळेल. कंट्रोल रुममध्ये दहा डॉक्टरांचे पथक उपस्थित राहील. ते परिस्थितीनुसार निर्णय घेऊन कोणत्या हॉस्पिटलला जावयाचे याची संबंधिताना सूचना करतील. तसेच दहा ते पंधरा मिनिटात त्या ठिकाणी रुग्णवाहिकादेखील उपलब्ध होऊ शकेल. महानगरपालिकेने २५० नवीन ॲम्बुलन्स रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या असून आता महानगरपालिकेकडे एकूण ३३० रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. ५० बेस्ट बसेस, २०० इनोव्हा-टाटा सुमो गाड्यांमध्ये बदल करून त्यात रुग्णवाहिकेसारखी सुविधा केली आहे. केवळ दहा ते पंधरा मिनिटात आता मुंबईकरांना रुग्णवाहिका उपलब्ध होईल.
एमएमआरडीए, नेस्को, एनएससी डोम येथे तात्पुरत्या सुसज्ज हॉस्पिटलची उभारणी
एम.एम.आर.डी.ए.ने बांद्रा येथे १ हजार खाटांचे मोठे हॉस्पिटल उभे केले असून नुकतीच त्याची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. त्या ठिकाणी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथून ५० डॉक्टरांचे पथक आलेले आहे. त्यांची व्यवस्था देखील बाजूला ट्रायडंट हॉटेलमध्ये केली आहे. याजवळील एशियन हार्ट हॉस्पिटलने आयसीयुची सुविधादेखील उपलब्ध करून दिली आहे. केवळ चार पाच मिनिटाच्या आत गरज भासल्यास रुग्णाला एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करता येऊ शकेल. फेज २ मध्ये आणखी हजार खाटांची व्यवस्था याठिकाणी करण्यात येईल.तसेच नेस्को, गोरेगाव येथे १ हजार खाटांचे रुग्णालय तयार असून आयसीयुची व्यवस्था त्याजवळील बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात करण्यात आली आहे. वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या डोम मध्ये ५०० खाटांचे व ५० खाटांचे आयसीयू असलेले हॉस्पिटल मंत्री आदित्य ठाकरे यांनी सीएसआर फंडाच्या माध्यमातून उभे केले असून ते ३१ मे पर्यंत तयार होत आहे .त्यासोबतच रेस कोर्स पार्किंगमध्ये ८०० खाटांचे रुग्णालय जूनअखेरपर्यंत तयार होईल. याखेरीज मुलुंड नाका येथे १ हजार व दहिसर नाका येथे १ हजार खाटांचे हॉस्पिटल पुढील काही दिवसात तयार होत आहे. त्यामुळे रूग्णांसाठी मोठ्या प्रमाणावर  बेड उपलब्ध होतील, अशी माहिती श्री. पाटील यांनी दिली.Post a comment

 
Top