BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाडमधील एका शेतकरी कुटुंबाने चक्क प्रेताच्या राखेतून वृक्षरोपण केल्याचा प्रकार समोर आला आहे.मुरबाड तालुक्यातील टेंभरे बुद्रुक गावातील जेष्ठ नागरिक
महादू लक्ष्मण जाधव यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ७५ व्या वर्षी दोन दिवसांपूर्वी मंगळवारी
राहत्या घरी निधन झाले होते. जाधव कुटुंबाचा तालुक्यात मोठा गोतावळा असल्याने या कार्याला
मोठ्याप्रमाणात गर्दी होण्याची संभावना होती. परंतु संपूर्ण देशात कोरोनाच्या संसर्गाचा
वाढता प्रभाव पाहता तसेच शासनाने घालून दिलेल्या मर्यादांचा भान राखत या कुटुंबीयांनी
त्यांचे सर्व विधिकार्य आज एकाच दिवशी घरगुती स्वरूपात कायद्याचे पालन करीत पार पाडले.तर
जळालेल्या प्रेताची राख स्मशानभूमीच्या शेजारील मुरबाडी नदीत सोडली जाते. सदर नदीचा
पाणी गावात दैनंदिन कामांसाठी वापरला जातो. तसेच गावातील जनावरे दररोज नदीवर पाणी पिण्यासाठी
येत असून गावातील महिलांची दिवसभर कपडे धुवण्यासाठी नदीवर गर्दी असते. त्यामुळे प्रेताच्या
राखेने नदीपात्र दूषित होण्याची संभावना असल्याने ती राख मयताच्या कुटुंबीयांनी नदीत
न टाकता गोणींमध्ये भरून आपल्या शेतावर खड्डे करून वृक्षरोपण करण्यासाठी वापरली. त्यामुळे
रोपांना व पर्यायाने शेताला खत मिळेल अशी भावना मयत महादू जाधव यांचे नातू राहुल धनगर
यांनी व्यक्त केली.तर या निर्णयाने जुन्या
अनिष्ट प्रथांचा नायनाट होण्यास मदत होऊन तालुक्यात एक सामाजिक व वैज्ञानिक प्रबोधनाचा
संदेश जाईल अशी अपेक्षा गावकऱ्यांनी मांडली आहे. त्यामुळे एका नवीन विचारसरणीचा पाया
मुरबाड तालुक्यातून रोवला जाईल ही आशा यातून व्यक्त केली आहे.
Post a comment