0
BY – गौरव एन.शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मंत्रालय,मुंबई |
पोलिसांचे कामाचे स्वरूप लक्षात घेता येत्या काळात पोलिसांची वार्षिक वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी वार्षिक अडीच हजार रुपये देण्यात येतील, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितले.विधानपरिषद सदस्य विलास पोतनीस यांनी पोलिसांच्या आरोग्य योजनेसंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. देशमुख बोलत होते. पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी महाराष्ट्र पोलिस कुटुंब आरोग्य योजना अस्तित्वात आहे. या योजनेंतर्गत 27 आकस्मिक आणि पाच गंभीर रोग/ आजारांवर विनामूल्य आंतररूग्ण उपचार घेता येतो. या योजनेमध्ये नवीन आजारांचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.पोलिसांचे कामाचे स्वरूप लक्षात घेता त्यांच्यासाठी वार्षिक आरोग्य तपासणी गरजेची आहे. ही बाब लक्षात घेता येत्या काळात त्यांच्यासाठी योजना राबविण्यात येणार असून वैद्यकीय तपासणीसाठी अडीच हजार रुपये देण्यात येणार आहेत. शासकीय सेवेतून निवृत्तीनंतर महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा समावेशाची बाब विचाराधीन आहे. महाराष्ट्र पोलिस कुटुंब आरोग्य योजनेची थकित देयके ही तीन महिन्यांच्या आत रुग्णालयाला मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे गृहमंत्री श्री. देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितले.यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री विनायक मेटे, गिरीश व्यास यांनी भाग घेतला.

Post a comment

 
Top