0
BY - मन्साराम वर्मा ,युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे |
कंपनीकडून शून्य टक्क्याने कर्ज उपलब्ध करून देतो, असे सांगत लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला पोलीसांनी अटक केले आहे. बोगस कॉलसेंटरच्या माध्यमातून लोकांशी संपर्क करून, त्यांना विविध कारणे सांगत ऑनलाईन पैसे स्विकारणाऱ्या 'केटर ऑनलाईन रिटेल प्रा. लि. कंपनी'च्या पाचजणांना ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने त्यांना १८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गणेश तिरुपल्ली, गणेश मांजरेकर , ज्ञानेश्वर कांबळे, धीरज सिंग आणि तुषार सोनावणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे पाचही जण केटर ऑनलाईन रिटेल प्रा. लि. आणि स्टेज डोअर कम्युनिकेशन प्रा. लि. कंपनीत संयुक्तरित्या काम करत होते. वागळे इस्टेट (रोड नं २२ प्लॉट क्र. ए/३२१) येथे डिसेंबर २०१९ पूर्वीपासून केटर ऑनलाईन रिटेल प्रा. लि. व स्टेज डोअर कम्युनिकेशन प्रा. लि. हे बोगस कॉलसेंटर चालवून या पाचही जणांनी महाराष्ट्र आणि देशभरातील लोकांना गंडा घातला आहे.
या प्रकरणी तक्रारदारांच्या मदतीने वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत पाचही जणांना बेड्या ठोकल्या. बजाज कंपनीच्या नावे अन्य कोणाची फसवणूक झाली असल्यास तक्रारदाराने ठाणे शहर कोर्टनाका ठाणे येथे किंवा ०२२-२५३४३५६५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन गुन्हे शाखेच्या पथकाने केले आहे.

Post a comment

 
Top