0
BY – गौरव एन.शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मंत्रालय,मुंबई |
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ६०७ उद्योगांपैकी ३११ कंपन्यांचा सर्व्हे केला असून, मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणाऱ्या ५० औद्योगिक कंपन्यांना नोटीस देण्यात आली असून, २१ कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. सांडपाण्यावर प्रक्रिया न करता पाणी बाहेर सोडण्यात येणाऱ्या प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या औद्योगिक कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री आदित्‍य ठाकरे यांनी विधानसभेत सांगितले. कल्याण-डोंबिवली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील कारखान्यांमुळे होत असलेल्या वायू प्रदूषणासंदर्भात सदस्य गणपत गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री.ठाकरे बोलत होते.
पर्यावरणमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, कोणत्याही औद्योगिक कंपनीमधून बाहेर पडणारे सांडपाणी हे प्रक्रिया होऊनच बाहेर सोडले जाणे सक्तीचे आहे. तसे न केल्यास संबंधित उद्योगांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवली येथील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेचे आधुनिकीकरण लवकरच करण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळी जे अनधिकृतपणे डम्पिंग करतात, ते रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी गस्त घालणारे पथक नेमण्यात आले आहे. याचबरोबर नगरविकास आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचीही माहिती मंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी दिली.याचबरोबर मौजे शेलार येथील बेकायदेशीर कारखान्यांमुळे होत असलेल्या प्रदूषणाबात शांताराम मोरे यांनी विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना मंत्री श्री. ठाकरे म्हणाले,  या परिसरातील दोन कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. दोन कंपन्यांना नोटीस देण्यात आली आहे. चार उद्योगांना प्रस्तावित आदेश बजावण्यात आले आहेत. या कंपन्यात कामगार काम करत असतात त्यामुळे ते पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात येते. मात्र, नियमांचे पालन करणाऱ्या कंपन्यांनाच परवानगी देण्यात येते. तसेच, स्थानिक परिसरातून येणारे सांडपाणी आणि औद्योगिक कंपन्यांतून येणारे रासायनिक पाणी यावर प्रक्रिया करूनच हे पुढे जलस्त्रोतात सोडण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मौजे शेलार भागात ७ हजार बेकायदेशीर इमारती होत्या. अनधिकृत इमारतींना नोटीस देण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. वारंवार नोटीस देऊनही जर कारवाई होत नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती श्री. ठाकरे यांनी दिली.

Post a comment

 
Top