0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या बहुचर्चित निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही  दोषींना शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजता दिल्लीतील तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आली. तब्बल सात वर्षांच्या दीर्घ न्यायालयीन संघर्षानंतर निर्भयाला आज न्याय मिळाला आहे, अशी भावना यावेळी निर्भयाच्या आईनं व्यक्त केली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत फाशीची शिक्षा रोखण्यासाठी निर्भयाच्या चारही दोषींनी प्रयत्न केला. दिल्ली उच्च न्यायालयानं रात्री 12.00 वाजेच्या दरम्यान ही याचिका फेटाळून लावत फाशीची शिक्षा कायम ठेवली.
निर्भया प्रकरणी चारही दोषींना आज तिहार तुरुंगात फाशी दिली गेली. तिहार तुरुंगात एकाचवेळी चार जणांना फासावर चढविण्याची ही पहिलीच घटना आहे. तिहारच्या तुरुंगाच्या क्रमांक तीनमध्ये आज ही फाशी दिली गेली. फाशीसाठी बिहारच्या बक्सरमधून दोर मागवण्यात आले होते. दोषींना फासावर लटकवल्यानंतर डॉक्टरांचं पथक जेलमध्ये दाखल झालं. चारही दोषींना मृत्यू घोषीत केले. त्यानंतर दोषींचे मृतदेह दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले जातील. मग दिन दयाल उपाध्याय रुग्णालयात त्यांचं शवविच्छेदन केलं जाईल.

Post a comment

 
Top