0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – नवी मुंबई |
कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेसाठी आणि आवश्यकत्या सेवा सुविधांसाठी कोकण विभागीय महसूल आयुक्त कार्यालयातील नियंत्रण कक्षातून मिशन मोडवर काम केले जात आहे. विभागीय आयुक्त श्री.शिवाजीराव दौंड यांनी आज संबंधित सर्व विभागांच्या प्रमुखांशी संवाद साधून आगामी काळात आवश्यक असणा-या बाबींबाबत मिशनमोडवर काम करण्याच्या सक्त सूचना दिल्या.
आगामी आपत्कालिन परिस्थितीसाठी डी.वाय.पाटील विद्यापीठ, भारती विद्यापीठ, तेरणा मेडिकल डेंटल कॉलेज, येरळा मेडिकल कॉलेज, एम.जी.एम.विद्यापीठ यांच्या सहकार्याने अधिकाधिक वैद्यकीय सुविधा आणि तज्ञ वैद्यकीय कर्मचारी अधिक प्रमाणात कशा पध्दतीने उपलब्ध होतील आणि एकाच छताखाली कोरोना संदर्भात सर्व उपचार उपलब्ध होतील याबद्दल आढावा घेतला.  होमकोरन्टटाईल असणा-या व्यक्तींना आवश्यकत सुविधा भविष्यात मिळण्यासाठी वैद्यकीय सुविधा केंद्र उभारण्याबाबत चर्चा झाली. कोकण विभागात विषाणुच्या चाचणीसाठी आवश्यक असणारे किटस, मास्क, व्हेंटिलेटर, रुग्णालयाची सुसज्जता  याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे, मोठ्याप्रमाणात रुग्ण आल्यास तात्पुरत्या पण मोठ्याप्रमाणात सुसज्ज आरोग्य यंत्रणा निर्माण करावी. गावपातळीवर काम करणारी आशा आणि अंगणवाडीसारखी यंत्रणाही सज्ज ठेवावे. असेही त्यांनी सांगितले.महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास केंद्र, अन्न व औषध प्रशासन, वैद्यकीय संचालनालय, जिल्हा उद्योग  केंद्र, महानगरपालिका, राज्य उत्पादन शुल्क, पोलीस यंत्रणा, परिवहन व्यवस्था, रस्ते व वाहतूक शाखा, पुरवठा विभाग यासह आगामी काळात लागणा-या जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी विविध विभागांच्या प्रमुखांशी त्यांनी चर्चा केली. कोरोना संदर्भात भविष्यात कोणतीही अडचण उपचारादरम्यान राहू नये यासाठी आवश्यक आणि पुरेशा बेडची संख्या आणि त्यासाठी लागणा-या वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता याबद्दलही आढावा घेतला.
कोकण विभागात  प्रत्येक कामाची विभागणी करण्यात आली आहे. त्याप्रमाणेच एक माणूस एक काम या पद्धतीने जिल्हास्तरावरही कामाची विभागणी  केली जावी, यंत्रणा सक्षमपणे कार्यरत राहावी यासाठी यंत्रणेत काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्या आरोग्याचीही काळजी घ्यावी. अशा सूचना केल्या.जीवनावश्यक वस्तूंचा साठा कमी पडू नये यासाठी पुरवठा विभागासह मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती, दुध उत्पादक, औषध विक्रेते याबद्दलही त्यांनी योग्य ते निर्देश संबंधितांना दिले. जिल्हापातळीवर जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त यांनी आवश्यक ते सर्व निर्णय घ्यावेत. असेही त्यांनी स्पष्ट केले. कोकण विभागातील जनतेने अनावश्यक कामासाठी बाहेर पडू नये. आतापर्यंत जे सहकार्य केले आहे. असे सहकार्य आगामी काळात करावे. असेही श्री.दौंड यांनी सांगितले.

Post a comment

 
Top