0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात चार ठिकाणी रुग्णालयात विलगीकरण कक्षात भरती करण्यात आलेल्या  सर्व १७ प्रवाशांपैकी १२ जणांना घरी सोडण्यात आले आहे. उर्वरित ५ जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यावर त्यांनाही डिस्चार्ज दिला जाईल, असे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे. दरम्यान, पुणे येथे काल रात्री दोघांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. सध्या मुंबई येथे दोन तर पुणे येथे तीन जण रुग्णालयात आहेत. राज्यभरात एकूण ७२ प्रवाशांची दूरध्वनीवरून विचारपूस केली जात आहे.मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात आतापर्यंत ८जण दाखल होते त्यापैकी सहा जणांना घरी सोडले आहे. पुणे येथील नायडू रुग्णालयात काल दोघांना भरती केले त्यापूर्वी दाखल असलेल्या पाच जणांपैकी चौघांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या तिघे दाखल आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर आणि नांदेड येथील भरती केलेल्यांनाही  घरी सोडण्यात आले आहे.मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल तपासणी सुरु असून आतापर्यंत ६४३२ इतके प्रवासी तपासण्यात आलेले आहेत.  सर्व प्रवाशांचा त्यांच्या आरोग्यस्थिती बाबत नियमित पाठपुरावा करण्यात येत आहे.करोना संदर्भात नागरिकांच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांक १०४ उपलब्ध करण्यात आला आहे. याशिवाय संचालक आरोग्य सेवा पुणे यांच्या नवीन मध्यवर्ती इमारतीमधील कार्यालयात करोना नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा दूरध्वनी क्रमांक ०२० - २६१२७३९४ असा आहे. करोना संदर्भातील मार्गदर्शक सूचना आणि आरोग्य शिक्षण विषयक साहित्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.

Post a comment

 
Top