0
BY – युवा महाराष्ट्र लाइव  - नवी दिल्ली | 

आजच्याच दिवशी १४ फेब्रुवारी २०१९ ला पुलवामा दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये केंद्रीय पोलीस राखीव दल (सीआरपीएफ)च्या ४० जवानांना वीरमरण आले होते. या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. त्यामुळे आजचा दिवस हा भारताच्या इतिहासामधील काळा दिवस आहे. सीआरपीएफ जवानांच्या ७८ गाड्यांचा ताफा जम्मूवरून श्रीनगरला जात होता. यावेळी पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथे जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेने आत्मघाती हल्ला केला. यामध्ये महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील संजयसिंह भिकमसिंह राजपूत (४५) आणि लोणार तालुक्यातील चोरपांग्रामधील नितीन शिवाजी राठोड (३७) या दोन जवानांना देखील वीरमरण आले होते. हल्ला झाल्यानंतर जैश-ए-मोहम्मद संघटनेने त्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर टाकला होता. यामध्ये आत्मघाती हल्ला करणारा आदिल अहमद दार हा दहशतवादी होता. तो दक्षिण काश्मीरमधील गुंडिबाग येथे राहत होता. तसेच हल्ला झालेल्या ठिकाणापासून त्याचे घर अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर होते. तसेच हल्ल्याच्या काही वेळापूर्वी त्याने हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचेही सांगितले जात होते. या व्हिडिओमध्ये त्याने १ वर्षापासून या हल्ल्याची तयारी सुरू असल्याचे कबुल केले होते.

Post a comment

 
Top