web-ads-yml-728x90

Breaking News

मराठीतील विपुल साहित्यसंपदेमुळे महाराष्ट्र समृद्ध - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
मराठी भाषा ही वीरांची भाषा आहे. तिला हजारो वर्षांची परंपरा लाभलेली आहे, ती शतकानुशतके टिकून राहील. मराठी भाषेतील विपुल साहित्यसंपदेमुळे महाराष्ट्र समृद्ध आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री.ठाकरे बोलत होते.यावेळी मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत, आमदार राहूल नार्वेकर, मराठी भाषा सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा, माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, दहावीपर्यंत मराठी भाषा सर्व शाळांमधून अनिवार्य करण्यासाठीचा कायदा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संमत झाला आहे.  हा कायदा माझ्या कालावधीत होत आहे, हे माझे भाग्य. लहानपणापासून साद घालणारे अंगाईगीत, नंतर भावगीत, युद्धभूमीवरील समरगीत, शाहिरांच्या रुपाने अंगात वीरश्री संचारणारा पोवाडा या सर्वांमुळे मराठी समृद्ध आहे. हे अक्षरधन पुढच्या पिढ्यांना देत राहावे. मराठी संस्कृतीचा अमूल्य ठेवा भावी पिढीसाठी जपण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.परप्रांतियांनीदेखील ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्याची भाषा आत्मसात करावी आणि त्याचा वापर करावा असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

No comments