0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सरकारी शाळांमध्ये अत्याधुनिक व्हर्च्युअल क्लासरूम तयार करावे. जेणेकरून विद्यार्थी डिजिटल सादरीकरणे पाहून त्याबद्दल चर्चा करू शकतील, गटात कार्य करताना शिक्षण संसाधनांमध्ये व्यग्र राहून याद्वारे सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असे पर्यावरण व पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. ते आज दहिसर भागातील विविध समस्या संदर्भात बोलत होते.यावेळी पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी दहिसर (पूर्व) मधील वाहतूक कोंडी निवारणासाठी बसेसच्या फेऱ्या वाढवून रहदारी नियंत्रण करण्याचे आदेश दिले. शिक्षण आणि आरोग्य हे विकासाचे महत्त्वाचे निर्देशक आहेत. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुरक्षित व स्वच्छ ठेवण्याकरिता कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. साचलेले पाणी, रस्त्यावरील सांडपाणी यामुळे मागील काही दिवसांपासून दहिसर परिसरात डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे. या परिसरात परिणामकारक औषध फवारणी तसेच गटारात द्रवरूप औषधे वापरून सर्व घरे, सोसायट्यांजवळील आवारात त्यांचा वापर केला जावा, असे पालकमंत्र्यांनी सूचित केले.मुंबई उपनगरचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी दहिसरमधील पदपथ सुधारणा, कचरा व्यवस्थापन, दूषित पाण्याचा प्रश्न यासंदर्भात अधिकाऱ्यांसमवेत चर्चा झाली. दहिसर स्थानकालगत असलेली वाहतूक कोंडी, कचऱ्याचा प्रश्न, खंडीत वीजपुरवठा, ओव्हरहेड वायर्स यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांचे निवारण करण्याच्या सूचना मंत्री श्री. ठाकरे यांनी दिल्या.याप्रसंगी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, उपआयुक्त विश्वास शंकरवार, सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर आदी उपस्थित होते.

Post a comment

 
Top