0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – सिंधुदुर्ग |
तिलारी जलविद्युत प्रकल्पाच्या मागील क्षेत्रामध्ये वन्यजीव संवर्धनासाठी राखीव जंगल यासह इको टुरिझम निर्मिती प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात सिंधुदुर्ग जिल्हा आढावा तसेच पर्यटन विकासाबाबत बैठक झाली.यावेळी उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री उदय सामंत, परिवहन व संसदीय कार्यमंत्री अनिल परब, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील विविध विषयांबाबत सविस्तर आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, तिलारी प्रकल्प क्षेत्रात पर्यटन विकासासाठी वन संवर्धन राखीव करून पर्यटनाच्या सुविधा उभारण्याबाबत एकत्रित प्रस्ताव तयार करावा. एलईडी मासेमारी विरोधात येत्या अधिवेशनात राज्याचा कडक कायदा निर्माण केला जाईल. जिल्ह्यातील सर्व रिक्त पदांचा आढावा संबंधित विभागांनी घेऊन पदे भरण्याविषयीची कार्यवाही तातडीने सुरू करावी. खासगी वनांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे वनांची नोंद बदलता येत नाही. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारची भूमिका मांडण्यासाठी वरिष्ठ विधिज्ञ नियुक्त करण्यात येईल. आकारीपड प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे सम प्रमाणात वाटणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी संबंधित प्रांताधिकाऱ्यांना आदेश द्यावेत आणि त्याचा आढावा घेऊन अहवाल सादर करावा.कबुलायतदार गावकार प्रकरणी जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाच्या नावे असलेल्या 658 हेक्टर जमिनीबाबत एकत्रित बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे सांगून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले,  जिल्ह्यात बांधण्यात येणारे धूप प्रतिबंधक बंधारे हे दगडी बांधण्यासाठी संबंधित विभागाने प्रस्ताव करावा. सागरी महामार्गाच्या काँक्रिटीकरणाऐवजी कमी खर्चात टिकाऊ रस्ते निर्मितीसाठी बॅच मिक्सचा वापर करावा. रेडी व आरोंदा बंदर पुन्हा शासनाकडे घेण्याबाबत विचार करण्यात येईल, पाणबुडी प्रकल्पाविषयी सकारात्मक विचार करू, जिल्ह्यात  अद्ययावत असे क्रीडा संकुल उभारण्यात येईल. कवी मंगेश पाडगावकर यांच्यासह अन्य महनीय व्यक्तींच्या स्मारकांच्या उभारणीबाबत प्रस्ताव द्यावेत. त्यामध्ये त्या व्यक्तीविशेषांचा समावेश राहील याची काळजी घ्यावी. महिनाभरात पर्यटन विकास महामंडळाने जिल्ह्याचा परिपूर्ण पर्यटन आराखडा सादर करावा अशा विविध सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

Post a comment

 
Top