BY – युवा महाराष्ट्र लाइव – नंदुरबार |
शिस्त, परिश्रम, उद्दिष्ट, मातृभाषेचे ज्ञान आणि गुरुजनांचा
आदर या पंचसूत्रीच्या आधारे विद्यार्थ्यांनी आपले जीवन यशस्वी करावे, असे प्रतिपादन
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.नंदुरबार येथील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल
येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी खासदार हिना गावित,
राजभवनचे प्रधान सचिव संतोष कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वसुमना
पंत उपस्थित होते. राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, यश संपादन करण्यासाठी जीवनाला
दिशा हवी. विद्यार्थ्यांनी निश्चित उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल केल्यास यश हमखास
मिळते. त्याला परिश्रमाची जोड आवश्यक असल्याने अध्ययनावर लक्ष केंद्रित करा व शालेय
जीवनात मोबाईलपासून दूर रहा. आई, वडील आणि गुरुजनांविषयी आदरभाव बाळगा आणि शिक्षकांवर
श्रद्धा असू द्या. आपल्या भाषेचे ज्ञान असल्यास देशासाठी उत्तम कार्य करू शकाल, असे
त्यांनी सांगितले. रुपाली पावरा हिने 'राज्यपाल होण्यासाठी काय करावे' असे विचारले
असता तुम्ही ध्येयनिष्ठ जीवन जगल्यास या पदापर्यंत पोहोचू शकतात, असे श्री.कोश्यारी
म्हणाले.विद्यार्थ्यांनी विद्यालयाची माहिती उत्तमरितीने दिल्याबद्दल त्यांनी कौतुक
केले. एकलव्य विद्यालयाने अनेक पुरस्कार मिळविल्याबद्दल त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचे
अभिनंदन केले.
Post a comment