0
BY – युवा महाराष्ट्र लाइव –  ठाणे |
मुंब्रा-कळवा रेल्वे प्रवासादरम्यान गर्दीमुळे लोकलमधून खाली पडून ४० वर्षीय महिला गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. कलावती यादव असे जखमी महिलेचे नाव असून कामावर जात असताना ही घटना घडली. गर्दीमुळे मुंब्रा आणि कळवा दरम्यान त्या खाली कोसळल्यानंतर ठाणे रेल्वे पोलिसांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. परंतु पुढील उपचारासाठी त्यांना सायन रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मुंब्रा-कळवा रेल्वे स्थानकातील प्रवाशांना सकाळच्या वेळात लोकलमध्ये चढण्यासाठी या स्थानकातील प्रवाशांना मोठा संघर्ष करावा लागतो. लोकलमध्ये चढल्यानंतरही धक्काबुक्की होत असल्याने प्रवाशांना जीवही गमवावा लागतो. बुधवारी कलावती कामावर जाण्यासाठी निघाल्या होत्या. गर्दीमुळे त्या मुंब्रा येथील बोगद्याच्या परिसरात कोळसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला, कमरेला, हात आणि पायांना गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आहे. जखमी कलावती यांचे पती शेखबहादूर यांनी मात्र गर्दीतील धक्काबुक्कीमुळे हा अपघात झाल्याचे म्हटले आहे.

Post a comment

 
Top