0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यातील सनई-चौघडे, ढोल-ताशे, हलगी, लेझीम आणि मिल्ट्री बँडचे सुरेल सादरीकरण आणि जोडीला ‘जय भवानी, जय शिवाजी’ या उत्स्फूर्त घोषणांमुळे आज राजधानीतील ल्युटियन दिल्लीचा आसमंत दुमदुमला. उत्साहाने ओतप्रोत या वातावरणाचे साक्षीदार झालेल्या 10 देशांच्या राजदुतांनाही  या सोहळ्याने भुरळ घातल्याचे चित्र दिसून आले.शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने येथील कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आज शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सदनाच्या सभागृहात खासदार संभाजी छत्रपती यांनी सपत्निक छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवात सहभाग घेऊन शिवजन्माचा पाळणा केला. यानंतर संभाजी छत्रपती यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. महाराष्ट्र सदनाच्या केंद्रस्थानी स्थापित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला खासदार संभाजी छत्रपती आणि या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असणाऱ्या पोलंड, बल्गेरिया, स्पेन, रोमानिया, चीन, इजिप्त, कॅनडा, ट्युनिशिया, सायप्रस आणि इस्रायल या 10 देशांच्या राजदुतांनी  पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सदनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर सहाय, गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल यांच्यासह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी व दिल्ली राजधानी क्षेत्र, हरियाणा, उत्तरप्रदेशातून या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 

Post a comment

 
Top