0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
भारतातील लोकांमध्ये भाषा, लिपी, धर्म, पेहराव आदी अनेक भेद असले तरीही आपला देश संस्कृतीच्या धाग्याने घट्ट विणला गेला आहे. केरळचे देशाच्या संस्कृतीमध्ये तसेच एकात्मतेमध्ये मोठे योगदान असल्याचे उद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे काढले.  मुंबईमध्ये स्थलांतरित झालेल्या काही मल्याळी लोकांनी सन 1930 साली स्थापन केलेल्या बाँबे केरळीय समाज या संस्थेच्या स्थापनेला 90 वर्षे पूर्ण झाली. या निमित्त संस्थेतर्फे वर्षभर साजऱ्या केल्या जाणाऱ्या 'नवती समारोहाचे' उद्घाटन शनिवारी (दि. 8) राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत हिंदू कॉलनी दादर येथील बी.एन.वैद्य सभागृहात झाले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल म्हणाले, तेराशे वर्षांपूर्वी केरळच्या कालडी येथे जन्मलेल्या आद्य शंकराचार्यांनी देशाच्या अध्यात्मिक तसेच, सांस्कृतिक संवर्धनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी देशभरात भ्रमण करून कांचीपुरम, द्वारका, पुरी व बद्रीनाथ येथे मठ स्थापन करून समाजाच्या अध्यात्मिक प्रगतीसाठी प्रयत्न केले.मल्याळी भाषा व संस्कृती संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या बाँबे केरळीय समाज संस्थेचे अभिनंदन करताना राज्यपालांनी मातृभाषेच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. मातृभाषेत शिक्षण देणारे देश खरी प्रगती करतात असे त्यांनी सांगितले.बाँबे केरळीय समाज ही केरळबाहेरची सर्वात जुनी मल्याळी संस्था असून सन 1958 साली माटुंगा येथे संस्थेच्या 'केरळ भवनम्'चे उदघाटन तत्कालीन संरक्षण मंत्री व्ही के कृष्ण मेनन यांनी केले होते. सन 1962 साली मुंबई महानगर पालिकेने समाजाला शिवाजी पार्क येथे स्पोर्ट्स पॅव्हिलियन साठी जागा दिली. संस्था आज विविध ठिकाणी आयुर्वेद उपचार, पंचकर्म चिकित्सा, वाचनालय, 'विशाल केरळम' मासिक, मल्याळी भाषा वर्ग, भरतनाट्यम, मोहिनीअट्टम, कथक नृत्य वर्ग तसेच संगीत वर्ग चालवित आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश कुमार मधुसुदनन यांनी दिली.बाँबे केरळ समाजच्या नव्वदी निमित्त केरळचे लोकजीवन व संस्कृती तसेच मुंबईचे जनजीवन दर्शविणाऱ्या गाण्याचे उद्घाटन करण्यात आले.साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक सुभाष चंद्रन, सचिव प्रेम राजन नाम्बियार, 'नवती समारोह' समितीचे अध्यक्ष डॉ पी.जे. अप्रेन, आयकर विभागातील सह आयुक्त ज्योतीस मोहन आदी उपस्थित होते. यावेळी एका संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले.

Post a comment

 
Top