web-ads-yml-750x100

Breaking News

महाराष्ट्र राष्ट्रीय छात्र सेनेचे कार्य ही देशसेवाच - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
महाराष्‍ट्रातील विद्यार्थी हे राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून  देश निर्माण कार्यात अमूल्य योगदान देत आहेत. शिक्षण पूर्ण करीत असताना हे कार्य करणे ही एक प्रकारची देशसेवाच आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे काढले.
नवी दिल्ली येथे झालेले एनसीसीचे प्रजासत्ताक दिन शिबीर तसेच अखिल भारतीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्र एनसीसीच्या 116 कॅडेट्स व 10 अधिकाऱ्यांच्या विजयी चमूच्या सन्मानार्थ राज्यपालांनी राजभवन येथे स्वागत समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.राज्यपाल म्हणाले, एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबीर आणि अखिल भारतीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्र एनसीसीने उत्कृष्ट कामगिरी केली आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी 17 राज्यांमधून महाराष्ट्राने दुसरा क्रमांक पटकावला असून यामुळे राज्याची मान उंचावली आहे. मात्र, दुसऱ्या क्रमांकावर संतुष्ट न होता पुढील काळात प्रथम क्रमांक मिळावा यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा व्यक्त करुन राष्ट्रीय छात्र सेना ही सर्व कलागुणांनी संपन्न असली पाहिजे, त्याचबरोबर त्यांनी शिस्तबद्ध असणे आवश्यक आहे. केवळ स्वत:च शिस्तबद्ध न राहता इतरांनाही शिस्तबद्ध राहण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी करावा, तसेच देशातील नैसर्गिक साधनसंपत्तीची हानी होऊ नये याबाबतही राष्ट्रीय छात्र सेनेने  जनजागृती करावी, अशी अपेक्षा श्री. कोश्यारी यांनी व्यक्त केली.

No comments