web-ads-yml-750x100

Breaking News

स्टार किड्स किंग्डम फाउंडेशनचा ४ था वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा जल्लोषात संपन्न

BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
स्टार किड्स किंग्डम फाउंडेशन या संस्थेच्या मानपाडा शाखेचा ४ था वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा २०१९-२० दिनांक ५ फेब्रुवारी २०२० रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, घोडबंदर रोड, ठाणे येथे मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.या वेळी महोत्सवाचे उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय सौ. शिल्पा जेजुरकर मुख्याध्यापिका, अंबर इंटरनॅशनल स्कूल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. तर माननीय सौ. स्वप्ना मोगरे, संचालिका, करिअर मार्गदर्शन केंद्र यांच्या हस्ते गणेश पूजन करण्यात आले. यावेळी माननीय श्री मंदार टील्लू थियेटर डायरेक्टर, तसेच डॉक्टर उल्हास वाघ प्रख्यात दंतचिकित्सक, श्री.मॅक्सवेल अॅन्थोनी क्रीडा प्रमुख, सेंट ज्ञेविअर्स हायस्कूल, मानपाडा. संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रा. एकनाथ पवळे, सचिव डॉ. गणेश जनार्दन घुगरे , खजिनदार श्री. मारूती चव्हाण उपस्थित होते.
यावेळी बोलताना, आपले भारतीय विद्यार्थी गुणवत्तेमध्ये जगाच्या तुलनेत तसूभरही कमी नसून केवळ त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. ती गरज पूर्ण करत असतानाच विद्यार्थ्यांच्या केवळ शैक्षणिकच नव्हे तर भावनिक व बौद्धिक विकासाकडे सुद्धा तितक्याच तळमळीने लक्ष देत असल्याबद्दल सौ शिल्पा जेजुरकर यांनी संस्थेचे भरभरून कौतुक केले. तसेच सौ. स्वप्ना मोगरे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या अभ्यासाव्यतिरिक्त त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नृत्य, अभिनय, चित्रकला, क्रीडा अशा सर्वच कौशल्यांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याबद्दल शाळेचे अभिनंदन केले.याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी नृत्याच्या माध्यमातून देशाच्या सांस्कृतिक रूपाची ओळख उपस्थितांना करून दिली. तसेच ‘विविधतेतून भारतीय एकता’ या विषयावर शाळेच्या छोट्या कलाकारांनी सुंदर नाटिका सादर केली आणि आपल्या बहारदार अभिनयाने संवादफेक हिने प्रेक्षकांची मने जिंकली.शाळेच्या पालकांनीसुद्धा या सोहळ्यात मोठ्या हिरीरीने भाग घेत विविध गीतांवर नृत्य सादर करत कार्यक्रमाची रंगत वाढविली. याप्रसंगी शाळेच्या सर्व गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचे विविध पारितोषिके देऊन कौतुक करण्यात आले. यावेळी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोठ्या खुमासदार पद्धतीने कुमारी करुणा पांडे यांनी केले.उपस्थित मान्यवरांनी व प्रेक्षकांनी शाळेच्या विद्यार्थ्यांचे व शिक्षिका वर्गाचे भरभरून कौतुक केले. सदर कार्यक्रम दिमाखदार पद्धतीने संपन्न होण्यासाठी मानपाडा शाखेच्या सर्व शिक्षिका व कर्मचारी वर्ग तसेच फाउंडेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मनःपूर्वक सहकार्य केले.  शेवटी मानपाडा शाखेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती हिरे यांनी आभार प्रदर्शन करून मान्यवरांना व उपस्थितांना धन्यवाद दिले. कार्यक्रमाची सांगता भारताच्या राष्ट्रगीताने करण्यात आली.

No comments