web-ads-yml-750x100

Breaking News

वरसई आश्रमशाळेतील विद्यार्थिनी मृत्यूप्रकरणी दोन महिला अधीक्षिका आणि मुख्याध्यापक निलंबित

BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
पेण तालुक्यातील वरसई आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या आकस्मिक मृत्यूची गंभीर दखल आदिवासी विकास विभागाने घेतली असून या प्रकरणी पेण प्रकल्प अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करत दोन महिला अधीक्षिका आणि मुख्याध्यापक यांना कर्तव्यात हलगर्जीपणा व बेजबाबदारपणा केल्याबद्दल निलंबित केले आहे.
या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून मृत विद्यार्थिनीच्या पालकांना दोन लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय प्रकल्प अधिकाऱ्यांनी घेतला आहे.तसेच भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येत असून आश्रमशाळेत सध्या उपलब्ध असलेल्या सीसीटीव्हीबरोबरच वाढीव सीसीटीव्ही बसवण्यात येणार असल्याचे प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.वरसई आश्रमशाळेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला 4 फेब्रुवारी रोजी तिचे पालक भेटण्यास आले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 फेब्रुवारीला  सकाळी आश्रमशाळेत इतर विद्यार्थिनी  तसेच शिक्षकांना काहीही न सांगता ही  मुलगी आश्रमशाळेच्या बाहेर पडली. हे आश्रमशाळेतील सीसीटीव्ही फुटेजद्वारे निदर्शनास आले. या मुलीचा शोध घेण्यासाठी आश्रमशाळेकडून त्वरित  प्रयत्न करण्यात आले. तिच्या पालकांशी आश्रमशाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक संपर्कात होते. मात्र रात्री उशीरापर्यंत ही विद्यार्थिनी सापडली  नाही. अखेर 6 फेब्रुवारीला दुपारी आश्रमशाळेपासून तीन ते चार किमी लांब असलेल्या  जंगलात या विद्यार्थिनीने एका झाडाच्या फांदीला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात कोणतीही चिट्ठी लिहिलेली सापडलेली नाही. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पेण प्रकल्प अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करत आश्रमशाळेच्या दोन महिला अधीक्षिका  आणि मुख्याध्यापक यांचा  शासकीय कामात हलगर्जीपणा व बेजबाबदारपणा सकृतदर्शनी निदर्शनास आल्याने त्यांना  निलंबित केले आहे. तसेच भविष्यात आश्रमशाळेची सुरक्षा अधिक वाढविण्यासाठी अतिरिक्त सीसीटीव्ही आश्रमशाळेत लावण्याचा निर्णय घेतला आहे.


No comments