web-ads-yml-750x100

Breaking News

चांगले साहित्य वेदनेतून जन्मते -प्रा. अशोक बागवे

BY - युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे  |
मोर पिसाऱ्याच्या ओझ्यामुळे एक पाय वर एक खाली करतो. आपल्याला तो नाचतो असे वाटते. पण अशा वेदनेतून काळे ढग आल्यावर फुलोरा फुलवतो. कवींचेही तसेच असते. मोराच्या वेदनेला संवेदना देण्याचे काम कवी करत असतो, असे प्रांजळ मत प्रा. अशोक बागवे यांनी मांडले.
           ठाणे महापालिकेचे कर्मचारी कवी शिवराम (महेश) टक्के यांच्या छंद आनंद या काव्यसंग्रहाचे प्रकाशन गुरुवारी ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बागवे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, सभापती-स्थायी समिती राम रेपाळे, उपायुक्त तथा साहित्यिक संदीप माळवी, शिक्षणतज्ञ प्रदीप ढवळ, अशोक बुरपुल्ले, माजी उपमहापौर रमाकांत मढवी आणि विधीमंडळ पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, प्रा.एकनाथ पवळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भटू सावंत यांनी केले.
चांगले साहित्य वेदनेतून जन्म घेते. सोन्याचा चमचा घेऊन कवी होता येत नाही. प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्यांच्या हातून चांगले लिखाण होते असेही बागवे यांनी सांगितले. ज्ञानसाधना महाविद्यालयात अनेक वर्ष शिकवले. या महाविद्यालयातील मुले गरीब घरातली होती, पण मनाने  श्रीमंत होती. या मुलांमध्ये काहीतरी बनण्याची जिद्द होती. त्यातूनच अनेक विद्यार्थी घडले आणि विविध क्षेत्रात ते अधिकार पदावर कार्यरत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
            कवी महेश टक्के यांच्या कवितेत एक आत्मीयता दिसते. नवे मांडण्याची क्षमता त्यांच्यात आहे. येत्या काळात त्यांचे आणखी संग्रह यावेत अशा शुभेच्छा महापौर नरेश म्हस्के यांनी दिल्या. ज्ञानसाधना हे एक विद्यापीठ आहे, आणि त्या महाविद्यालयाच्या अनेक चांगल्या प्राध्यापकांमुळे माझ्यासह अनेक विद्यार्थी घडले, असेही म्हस्के यांनी सांगितले.


No comments