Breaking News

पुण्यातील लक्ष्मी रोडवरील शूज शोरुमच्या मालकाचे दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करुन खून..

BY - नितिन पुंडे,युवा महाराष्ट्र लाइव - पुणे |
पुणे शहरातील लक्ष्मी रोडवर असलेल्या एका नामांकीत शूज शोरुमच्या मालकाचे दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करुन त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. चंदन कृपादास शेवानी (वय 48, रा. बंडगार्डन) या व्यापाऱ्याचे पुण्यातून शनिवारी अपहरण करण्यात आले. त्यांना साताऱ्यातील लोणंद येथील पाडेगाव कॅनालजवळ नेऊन गोळया घालून त्यांचा खून करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार,शेवानी यांचे लक्ष्मी रोडवर चप्पल विक्रीचे शोरुम आहे. शनिवारी ते दिवसभर घरीच होते. त्यानंतर कामानिमित्त रात्री 8.30 सुमारास शेवानी घराबाहेर पडले. ते पुन्हा घरी परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी चंदन शेवानी बेपत्ता झाल्याची तक्रार बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनीही त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शेवानी यांचा फोन बंद होता. शेवानी यांचे अपहरण करण्यात आल्याची शक्यता असल्यामुळे बंडगार्डन पोलिसांनी तत्काळ तपास सुरु केला. रविवारी दुपारी 12 वाजता सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यातील लोणंदजवळील पाडेगाव येथे एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह स्थानिक नागरीकांना आढळला. ही माहिती लोणंद पोलिसांना कळवण्यात आली. लोणंद पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एका अज्ञात व्यक्तीच्या डोक्यात गोळी झाडून, शरीरावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे निदर्शनास आले. सातारा पोलिसांनी पुण्यासह अन्य शहरातील पोलिसांशी संपर्क साधून हरवलेल्या व्यक्तींची माहिती घेतली. त्यावेळी बंडगार्डन पोलीस ठाण्यातंर्गत दाखल असलेल्या तक्रारीनुसार व्यापारी शेवानी बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन तो मृतदेह चंदन शेवानी यांचा असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. घटनास्थळी सातारा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्यासह फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी भेट दिली. याप्रकरणी लोणंदचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा पुणे पोलीसांकडे वर्ग करण्यात येणार आहे. पुण्यातील एका नामांकीत शूज शोरुमच्या मालकाचे अपरहण करुन खून करणाऱ्या आरोपीविरुद्ध लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील तपासासाठी पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे, असे तेजस्विनी सातपुते यांनी सांगितले.

No comments