0
BY – नितिन (आण्णा) पुंडे,युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
शेतकऱ्यांचे शेतीविषयीचे पारंपरिक ज्ञान अचंबित करणारे आहे. त्यांच्या ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.  राज्यातील शेतकऱ्यांना ताकद देऊन महाराष्ट्राला सुजलाम्-सुफलाम् करणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
शारदानगर (माळेगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने आयोजित "कृषिक 2020" प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कृषिक प्रदर्शन हे प्रात्यक्षिकासह असणारे सर्वोत्तम प्रदर्शन आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून अभिमान वाटावे असे काम झाले आहे. माळरानावर नंदनवन फुलले आहे. जग झपाट्याने बदलत असून विविध क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित होत आहे. आपला देश हा शेतीप्रधान असून शेती हाच आपला मुख्य कणा आहे. देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अनेक नैसर्गिक संसाधनांवर ताण आला आहे. सर्वांना जगविण्याचे काम शेतकरी करतो. मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, भविष्याचा विचार करून  आपल्याला पाण्याचे योग्य नियोजन करावे लागेल. हे नियोजन झाल्यास शेती समृद्ध होईल. आता मातीविना शेती आणि हवेवरील शेतीचे यशस्वी प्रयोग झाले आहेत. त्याचप्रमाणे व्हर्टिकल शेतीचेही प्रयोग सुरु आहेत. महाराष्ट्राच्या भूमीत अनेक चमत्कार होत असतात, शेतीच्या नवनवीन प्रयोगांचेही चमत्कार याच भूमीत होतील. महाराष्ट्राचा शेतकरी देशातील शेतकऱ्यांना नक्की  दिशा दाखवेल, असा विश्वास व्यक्त करत शेतीसाठी आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट शासन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


Post a comment

 
Top