web-ads-yml-750x100

Breaking News

हरित जिल्हा करण्यासाठी वनराई बंधारे ठरतील वरदान— गृहमंत्री एकनाथ शिंदे

BY - मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या वनराई  बंधाऱ्यामुळे जिल्हा हिरवागार होण्यास मदत होणार आहे. बंधाऱ्याच्या माध्यमातून  पाणी उपलब्ध असल्याने   शेतकऱ्यांना दुबार पिक घेणे सहज शक्य झाले असल्याचे मत राज्याचे गृह, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. भादाणे गावातील काळू नदीवर बांधण्यात आलेल्या विस्तीर्ण अशा बंधाऱ्याला त्यांनी आज भेट देऊन पाहणी केली. काळू नदीवर बांधलेल्या या बंधाऱ्यावर सगळ्यांनी  जल प्रतिज्ञा घेतली.  त्याच बरोबर पवित्र असणाऱ्या गंगा नदीचे जल या बंधाऱ्यात सोडण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत) अशोक पाटील, मुरबाड गट विकास अधिकारी विश्वनाथ केळकर तसेच जिल्हा परिषद , पंचायत समिती सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
 यावेळी श्री. शिंदे म्हणाले, शासनाचा एकही पैसा खर्च न करता जिल्ह्यात लोक सहभागातून वनराई बंधारे बांधले जात आहेत. आता पर्यंत १ हजार ६०० बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. आपल्याला जास्तीत जास्त बंधारे बांधावयचे आहेत त्यासाठी  लोकांची एकजूट महत्वाची आहे. लोकसहभागातून विकासाचे हे उत्तम उदाहरण असल्याचेहीत्यांनी सांगितले.
हा बंधारा १६ हजार ५०० गोण्यानी तयार केलेला आहे. बंधाऱ्यावर शेतकरी आजच्या घडीला भाजीपाला लागवड करत आहे. तसेच बंधाऱ्याच्या जवळच वीटभट्टी सुरू करण्यात आली आहे त्यामुळे गावातील 30 ते 40 कुटुंबाचा उदरनिर्वाह होण्यास मदत झाली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या संकल्पनेतून २ ऑक्टोबर २०१९ रोजी बंधाऱ्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती. तेव्हा पासून आजतायगत पाचही तालुक्यात बंधारे बांधले जात आहेत.  काही दिवसांपूर्वी नागरीकांना आणि  कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि अधिकारी यांनी संयुक्त दौरा करत खुद्द बंधारे बांधले होते. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत ग्रामसेवक या कामासाठी अग्रेसर आहेत.त्याच बरोबर आरोग्य, महिला व बाल विकास, शिक्षण, अर्थ, पशु संवर्धन, कृषी तसेच इतर काही सामाजिक संस्था आणि तालुका स्तरीय यंत्रणांनी बंधारे बांधण्यासाठी  प्रयत्न केले आहेत.
 बंधाऱ्याच्या पाण्यामुळे रब्बी हंगामातील पिकं घेतली जात आहेत. तसेच जनावराना देखील हे पाणी उपयुक्त ठरत आहेत. लोकांनीच बांधलेले हे वनराई बंधारे जिल्ह्यात लोकोपयोगी ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


No comments