BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
प्रत्येक शहराची ओळख आणि त्याचा चेहरामोहरा कायम ठेवून विकास
कामे करावीत. पायाभूत सुविधा आणि वाहतुकीचे जाळे हे विकासासाठी जीवन वाहिनीचे काम करतात,
असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नागपूर मेट्रोच्या ॲक्वालाईन उद्घाटन
सोहळ्याप्रसंगी केले.
मंत्रालयात व्हिडिओलिंकच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते ई-प्लागचे उद्घाटन तर हिरवी झेंडी दाखवून लोकमान्य टिळक स्टेशन ते सीताबर्डी
या ॲक्वालाईनचा शुभारंभ झाला. यावेळी मंत्रालयात नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव
नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विकास खारगे, महामेट्रोचे संचालक
रामनाथ सुब्रमण्यम आणि अतुल गाडगीळ उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे
यावेळी म्हणाले, नागपूर मेट्रोसाठी ज्यांनी मेहनत केली त्या सर्वांना त्याचे श्रेय
दिले पाहिजे. आम्हाला जनतेचे आशीर्वाद घ्यावयाचे आहेत, श्रेय नाही. असे सांगतानाच कुठल्याही
परिस्थितीत राज्याच्या या उपराजधानीचा विकासाचा वेग कमी होऊ देणार नाही, अशी ग्वाही
मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. विकास करताना त्या शहराची ओळख जपली जावी. पायाभूत सुविधांची
उभारणी झाल्यास उद्योग, व्यवसायांना चालना मिळेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख शहरांचा विकास
करताना त्यांचा चेहरामोहरा जपला जाईल अशा पद्धतीने कामे झाली पाहिजेत. नागपूर मेट्रोला
'माझी मेट्रो' हे नाव दिल्याने त्याविषयी नागरिकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होईल.
नागरिकांनी देखील या सुविधांचे संवर्धन करुन तिची निगा राखावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी
यावेळी केले.
केंद्र शासनाकडे काही
विकास कामांच्या आवश्यक त्या परवानग्या प्रलंबित आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी
त्या आवश्यक असून केंद्रीय मंत्रिमंडळातील महाराष्ट्राच्या सदस्यांनी या परवानग्या
मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगून जनतेला अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी
सर्वांनी प्रयत्न करुया, असे आवाहन करतानाच नागपूर मेट्रोतून प्रवास करण्याची इच्छा
मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
Post a comment