0
BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
पनवेल तालुक्यातील आपटा शाखेच्या बँक ऑफ इंडियाने फसवणूक केल्याचा आरोप करीत आंदोलन करणाऱ्या महेंद्र देशमुख या शेतकऱ्याची कैफियत कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज ऐकून घेतली. या प्रकरणाची त्रिसदस्यीय समितीमार्फत आठ दिवसांत चौकशी करण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिले. विभागाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी एका शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केल्याची भावना कृषिमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.महेंद्र देशमुख यांनी बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेतल्याचे बँकेचे म्हणणे असून बँकेचा व्यवहार मान्य नसल्याचे श्री.देशमुख यांनी कृषिमंत्र्यांना सांगितले. श्री.देशमुख यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्याचे गांभीर्य ओळखून कृषिमंत्री श्री.भुसे यांनी आज तातडीने श्री.देशमुख यांना कुटुंबियांसह निवासस्थानी बोलवून घेतले. त्यांच्यासोबत सुमारे दोन तास चर्चा केली. यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, पनवेलचे तहसिलदार अमित सानप, बँक ऑफ बडोदाच्या शाखा व्यवस्थापक आणि अन्य अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन श्री.देशमुख यांना लवकरात लवकर न्याय कसा मिळेल याबाबत सूचना केल्या.कृषीमंत्र्यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत या प्रकरणाची अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक आणि लेखा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीद्वारे चौकशी करुन आठ दिवसांत मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यावेळी कृषिमंत्र्यांनी देशमुख कुटुंबियांची आस्थेने चौकशी करत त्यांना दिलासा दिला.

Post a comment

 
Top