BY – युवा
महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
मराठी भाषा लिहिताना व बोलताना
चुकीच्या शब्दांचा वापर टाळणे हेच मराठी भाषा
संवर्धनात प्रत्येकाचे योगदान ठरेल, अशा भावना
भाषातज्ज्ञ प्रा. भास्कर नंदनवार यांनी येथे व्यक्त केल्या.
महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या
वतीने १ ते १५ जानेवारी २०२० दरम्यान आयोजित
‘ मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या समारोप कार्यक्रमात प्रा. नंदनवार बोलत होते. मराठी भाषा संवर्धनात उल्लेखनीय योगदानासाठी
गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल आणि निवासी आयुक्त समीर सहाय यांच्या हस्ते दिल्लीतील
व्यक्ती व संस्थांचा यावेळी सत्कार करण्यात आला. पंधरवड्या दरम्यान घेण्यात आलेल्या
सुंदर हस्ताक्षर आणि निबंध स्पर्धेच्या विजेत्यांना यावेळी बक्षीस वितरीत करण्यात आले.
महाराष्ट्रीय स्नेहसंवर्धक समाज संस्थेचे
अध्यक्ष विजय महादाणी, वनिता समाजाच्या अध्यक्ष
नीलिमा चिमलवार, नूतन मराठी शाळेच्या
मुख्याध्यापिका शुभदा बापट, चौगुले पब्लिक
स्कूलच्या मुख्याध्यापिका पूजा साल्पेकर, भाषातज्ज्ञ प्रा. भास्कर नंदनवार आणि ज्येष्ठ
पत्रकार सुरेखा टाकसाळ यांचा यावेळी शाल, श्रीफळ
व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
सत्कारानंतर बोलताना भाषातज्ज्ञ प्रा. भास्कर नंदनवार म्हणाले, भाषाशास्त्राचा प्राध्यापक म्हणून गेली
३३ वर्ष काम केले आहे. गेल्या पंधरा वर्षापासून
दै. लोकमतमध्ये मराठी भाषेतील विविध शब्दांची व्युत्पती , नवीन शब्दार्थ किंवा प्रचलीत शब्दाबदल् माहिती सांगणारे सदर लिहित आहे. हे सर्व कार्य करीत असताना मराठी भाषा बोलताना व लिहिताना होत असलेल्या दुर्लक्षाकडे त्यांनी उपस्थितांचे
लक्ष वेधून विविध उदाहरणे दिली. चुकीच्या शब्दांचा वापर टाळणे हेच मराठी भाषा संवर्धनात प्रत्येकाचे येागदान ठरेल असे ते म्हणाले.
महाराष्ट्रीय स्नेहसंवर्धक समाज
संस्थेचे अध्यक्ष विजय महादाणी म्हणाले, महाराष्ट्राची संस्कृती,पंरपरा जपण्यासाठी व राज्यातील
उत्सव साजरे करण्यासाठी मराठी माणसांनी मिळून राजधानी दिल्लीत २३ डिसेंबर १९१९ रोजी
या संस्थेची स्थापना केली. सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या संस्थेने
यावर्षी शताब्दी वर्ष साजरे केले. ग. वा. मावळणकर, काकासाहेब गाडगीळ, विठ्ठलराव गाडगीळ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री
यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी या संस्थेचे अध्यक्षपद भूषविले आहे. दिल्लीत येणाऱ्या
महाराष्ट्रातील जनतेची रास्त दरात निवासी व्यवस्था व्हावी या उद्देशाने संस्थेने १९५१
मध्ये पहाडगंज भागात 'दिल्ली महाराष्ट्रीय समाज ट्रस्ट' ची स्थापना करून बृह्नमहाराष्ट्र
हे अतिथीगृह उभारल्याचे त्यांनी सांगितले.
Post a comment